कोल्हापूर : टोल देण्यावरून झालेल्या वादावादीचे पडसाद शुक्रवारी फुलेवाडी टोलनाक्यावर उमटले. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या करवीर तालुकाध्यक्ष व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्यामुळे संतप्त जमावाने या टोलनाक्याच्या केबिनची काच फोडून संताप व्यक्त केला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस आल्याचे पाहताच जमाव पसार झाला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या.याबाबत जयवंत मारुती येरुडकर (वय ३० रा. मडिलगे बुद्रुक ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) यांनी अनोळखी टेम्पोचालक व इतर आठ ते दहा अज्ञातांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा संशयित संदीप यशवंत कांबळे (२४, रा. आडूर, ता. करवीर), सचिन बाळासाो पोवार (२३, रा. खटांगळे, ता. करवीर), प्रशांत आंबले (२१, रा. बागल चौक), मारुती आत्माराज नंदिवाले (२९, कोपार्डे, ता. करवीर) या चौघांना पोलिसांनी अटक केली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेनाप्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे करवीर तालुकाध्यक्ष संदीप कांबळे व त्याचा मित्र सचिन पोवार हे दोघे शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने आयोजित केलेल्या भगव्या सप्ताह कार्यक्रमासाठी मिनी टेम्पोमधून आले होते. कार्यक्रम आटोपून हे दोघे दुपारी आडूर गावाकडे जात होते. टेम्पोचालक सचिन पोवार होता. हा टेम्पो फुलेवाडी टोलनाक्याजवळ आला. त्यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्याने संदीप कांबळे याच्याकडे टोल मागितला. संदीपने आम्ही टोल देत नाही, असे सांगितले. त्यावरून कर्मचारी व संदीप यांच्यात वादाला सुरुवात झाली. त्यातून टोलनाक्यावरील सर्व कर्मचारी टेम्पोजवळ आले. त्यांनी संदीपला टेम्पोमधून बाहेर काढले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडविण्यासाठी गेलेला त्याचा मित्र सचिन पोवारलाही कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर संदीप, सचिनने हा प्रकार शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना फोनवरून सांगितला.थोड्या वेळाने सात ते आठजण टोलनाक्यावर आले. ते आल्याचे पाहताच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेथून धूम ठोकली. यावेळी रस्ता रोको करून संताप व्यक्त केला. टोलनाक्यावर हा प्रकार झाल्याचे समजताच पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी आला.
कोल्हापुरात टोलनाका फोडला
By admin | Published: June 19, 2015 11:52 PM