लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : महास्वच्छता अभियानाअंतर्गत रविवारी शहरातून एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. या माेहिमेचा ९६ वा रविवार होता, तर स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांसह महापालिकेचे १३० कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.
शेंडापार्क ते एस.एस.सी बोर्ड, रंकाळा टाॅवर ते फुलेवाडी मुख्य रस्ता, खानविलकर पंप ते रमणमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेबलाईवाडी उड्डाण पुल, लिशा हाॅटेल चौक ते कावळा नाका, आदी परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. स्वरा फौंडेशनतर्फे रंकाळा परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रंकाळा रस्त्यावरील बाजूच्या रिकाम्या पट्टीवर लालमाती टाकून वेगवेगळ्या फुलांची झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. या मोहिमेत दोन जेसीबी, चार डंपर, सहा आरसी गाड्या, एक ट्रॅक्टर ट्राॅली, दोन औषध फवारणी पंपांचा वापर करण्यात आला. महापालिकेचे १३० अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.
हे अभियान महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतादूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, शुभांगी पोवार, सुशांत कावडे, महेश भोसले, स्वरा फौंडेशनचे अध्यक्षा सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, संचालक प्रमोद माजगावकर, प्राजक्ता माजगावकर, पीयूष हुलस्वार, डाॅ. अविनाश शिंदे, फैजान देसाई, संमेश कांबळे, आयुष शिंदे, आदी उपस्थित होते.
फोटो : २७०२२०२१-कोल-दसरा चौक
ओळी : महास्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिका कर्मचाऱ्यांनी रविवारी दसरा चौकात स्वच्छता मोहीम राबविली.