कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाच्या चळवळीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत २ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले, तर तब्बल ४९३ टन निर्माल्याचेही संकलन करण्यात आले.
गेली पाच वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून नदी, ओढ्यांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते काहिलीत करावे यासाठी जनजागरण सुरू करण्यात आले होते. ग्रामपंचायतींनीही यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. मंगळवारी दिवसभर ग्रामपंचायतींनी पर्यायी विसर्जनाच्या ठिकाणी कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित ठेवले होते. काहिलींची व्यवस्था करण्यात आली होती. शक्यतो पाण्यामध्ये निर्माल्य सोडू नये यासाठीही आवाहन केले होते. त्यामुळे यंदाही एकूण २ लाख ३५ हजार ६९१ मूर्तींचे संकलन करण्यात आले आणि त्यातील १ लाख २९ हजार ८०७ मूर्तींचे पर्यायी व्यवस्थेमध्ये विर्सजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे ग्रामपंचायतीच्या काहिलीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी टोप, ता. हातकणंगले येथे काहिलीमध्ये गणेश विसर्जन केले. अन्य पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेता. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना बाराही तालुक्यांची जबाबदारी दिली होती. त्यानुसार या सर्व अधिकाऱ्यांनी या तालुक्यात जाऊन या चळवळीला हातभार लावला.
चौकट
जिल्ह्यातील ग्रामपंचायती १०२५
घरीच विसर्जन केलेल्या मूर्ती २९०८
धातू व संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापना १११
ग्रामपंचायतीकडे संकलित घरगुती मूर्ती २, २९, २४८
ग्रामपंचायतीकडे संकलित सार्वजनिक मूर्ती ६४४३
निर्माल्य संकलन ४,९३,७६२ किलो
यासाठी वापरलेल्या घंटागाड्या २३१
ट्रॅक्टर्स १०९८
१४०९२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी मंगळवारी करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे काहिलीत गणेश विसर्जन केले.
१४०९२०२१ कोल झेडपी ०२
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी टोप (ता. हातकणंगले) येथे काहिलीत विसर्जन केले.