कोल्हापूर : राज्यातील कोरोनाचे वाढते संकट, त्यातून रक्ताची निर्माण झालेली टंचाई पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजनाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात झालेल्या शिबिरात तब्बल ३१७७ रक्त पिशव्यांचे संकलन झाले.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा भासत होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची माेहीम घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात ‘जीवनदान महाभियान रक्तदानाचा महासंकल्प’ मोहीम नेटाने राबवण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदींच्या पुढाकाराने पक्षाच्या विविध सेलने अभियान यशस्वीपणे राबवले.
कागल मतदारसंघात २००५ रक्तदाते
कागल मतदारसंघात सर्वाधिक २००५ रक्त पिशव्या संकलित झाल्या. हातकणंगले ३६८, राधानगरीत ३६६, करवीर १५८, पन्हाळ्यात १०५ व जिल्हा सेलच्या वतीने आयोजित शिबिरात १६२ जणांनी रक्तदान केले.
कोट-
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- अनिल साळोखे (जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी)
फोटो ओळी : राष्ट्रवादीतर्फे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. (फोटो-२३०४२०२१-कोल-एनसीपी)