रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने घरपट्टीची लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाईचे शस्त्र उगारले आहे. शहरातील मारुती मंदिर येथील संचयनी कंपनीचे कार्यालय तसेच माळनाका येथील निसर्ग फॉरेस्टच्या कार्यालयाला पालिकेने सील ठोकले असून, या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांनी ४ लाख ७५ हजार ९९६ रुपयांची घरपट्टी थकवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या करवसुली निरीक्षक अश्विनी वरवडेकर यांनी दिली. शहरातील माळनाका येथे गेल्या काही वर्षात निसर्ग फॉरेस्ट लि. कंपनीचे कार्यालय (इमला नं. ८७३ अ/३४) सुरु होते. हे कार्यालय स्लॅबचे छप्पर असलेले आहे. गेल्या काही काळापासून हे कार्यालय बंद पडले आहे. यामधील गुंतवणूकदारांचीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या कार्यालयाने नगरपालिकेचा घरपट्टी कर अनेक वर्षांपासून भरलेला नाही. त्यामुळे हा कर ९४ हजार २३० रुपये एवढा झाला आहे. वारंवार घरपट्टीची थकबाकी भरण्याबाबत पालिकेने या कंपनीला नोटीस बजावली होती. मात्र, निसर्ग फॉरेस्टकडून ही थकबाकी जमा न झाल्याने अखेर मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या जप्ती वॉरंट आदेशानुसार ही मालमत्ता पालिकेच्या करवुली व मालमत्ता विभागाने जप्त केली आहे. मारुती मंदिरजवळील संचयनी या गुंतवणूक कंपनीने आपले मोठे कार्यालय थाटले होते. या कार्यालयाकडूनही पालिकेला अनेक वर्षांची घरपट्टी मिळालेली नाही. त्यांच्याकडून थकीत असलेल्या घरपट्टीची रक्कम ३ लाख ८१ हजार ७६६ रुपये एवढी आहे. त्याबाबत कंपनीला सातत्याने नोटीस बजावून वसुली न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या जप्ती वॉरंट आदेशानुसार या मालमत्तेवरही पालिकेने टाच आणली आहे. या कार्यालयाला पालिकेच्या मालमत्ता व कर वसुली विभागाने सील केले असून, जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकीप्रकरणी पालिकेच्या मालकीचे भाडेतत्त्वावर दिलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमजवळील बारा गाळ्यांना अलिकडेच पालिकेने सील केले होते. सुमारे पावणेतीन कोटींची थकबाकी या गाळेधारकांकडे होती. त्यातील दहा गाळेधारकांनी २५ टक्के रक्कम भरुन उर्वरित रकमेचे धनादेश पालिकेला दिल्याने हे दहा गाळे त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित गाळ्यांची थकबाकी अद्याप जमा न झाल्याने या गाळ्यांना लावलेली सील अद्याप तशीच आहेत. (प्रतिनिधी)
‘संचयनी, निसर्ग’ला सील फसवणूक प्रकरण
By admin | Published: July 22, 2014 11:50 PM