कोल्हापूर : नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अमित सैनी यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. यावेळी मावळते जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सैनी यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अमित सैनी शुक्रवारी कोल्हापुरात पोहोचले. मात्र, राज्यपाल सी. विद्याशंकर राव यांचा दौरा असल्याने मावळते जिल्हाधिकारी राजाराम माने दुपारी साडेतीनपर्यंत त्यांच्या दौऱ्यात होते. त्यामुळे सायंकाळी सव्वापाच वाजता राजाराम माने त्यांच्या कार्यालयात पोहोचले. पाठोपाठ नवे जिल्हाधिकारी डॉ. सैनीही पोहोचले. त्यांनी रितसर कार्यभार स्वीकारल्यानंतर माने कार्यालयातून बाहेर पडले. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारताच डॉ. सैनी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, करवीरचे प्रांत प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी, तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगीता चौगुले, आदी उपस्थित होते. डॉ. अमित सैनी यांनी ९ एप्रिलला कार्यभार स्वीकारला होता. परंतु, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच कार्यभार स्वीकारावा, असे सांगितल्याने डॉ. सैनी यांना परत जावे लागले होेते. गुरुवारी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सैनी यांनी कार्यभार स्वीकारला. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी अमित सैनींनी कार्यभार स्वीकारला
By admin | Published: April 25, 2015 12:35 AM