कोल्हापूर : नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून गुरुवारी सकाळी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी डॉ. बलकवडे यांनी त्यांना कोल्हापूरची तसेच कोरोना स्थितीची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्यांचे स्वागत केले.
मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई सध्या रजेवर असल्याने महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारी पदाची धुरा होती. अकोल्यात ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक असलेले राहुल रेखावार यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मंगळवारी नियुक्ती झाली. गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच ते केंद्रीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने व संघटनांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. रेखावार यांनी सिंधुदुर्ग येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथील इटापल्ली, नागपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. हिंगोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, परभणी महापालिकेत आयुक्त, धुळे येथे जिल्हाधिकारी, महावितरण औरंगाबादला सहाय्यक संचालक, बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे.
---
फोटो नं १५०७२०२१-कोल-राहुल रेखावार
ओळ : कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरूवारी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला.
---