लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊत तात्काळ समाजकल्याण आयुक्तांकडे ऑनलाईन पध्दतीने वर्ग करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरले असल्याने तातडीने पाठवावेत, अशाही सूचना केल्या आहेत. या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी ३ डिसेंबर २०२० पासून सुरुवात झाली आहे.
सोमवारी महिला लोकशाही दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : फेब्रुवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवारी ११ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. पीडित महिलांनी तक्रार अर्जासोबत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. डी. शिंदे यांनी केले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला, लोककलेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. विद्यार्थ्यांनी शाळेकडे २७ फेब्रुवारीपर्यंत, तर शाळांनी विभागीय मंडळाकडे १५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे सुचित केले आहे. कोणतेही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाहीत, याची सर्व शाळा प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असेही बजावले आहे.
कृषीच्या रोजंदारी मजुरांना लेखी म्हणणे सादर करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषी विभागांतर्गत रोजंदारी मजुरांची तात्पुरती ज्येष्ठतासूची कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या ज्येष्ठता सूचीबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित रोजंदारी मजुरांनी नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसांच्या आत योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह आपले लेखी म्हणणे सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय फळ रोपवाटिका, कृषी पर्यवेक्षक, कृषी चिकित्सालय व तालुका बीज गुणन केंद्र कार्यक्षेत्रावरील कार्यरत रोजंदारी मजुरांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अभिलेखावरून घेण्यात आली आहे. कालावधीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असेही वाकुरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्याकडील कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा साताऱ्यात निवासस्थानाकडे प्रयाण करणार आहेत.
एअर मार्शल अजित भोसले मंगळवारी कोल्हापुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : संघ लोक सेवा आयुक्त सदस्य एअर मार्शल अजित भोसले हे मंगळवारपासून तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजता कोल्हापुरात आल्यानंतर ते चार वाजता बस्तवडे (ता. कागल) येथे जाणार आहेत. बुधवारी पहाटे अंबाबाई काकड आरती आणि दर्शनानंतर ११ वाजाता ते डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या हॉटेल सयाजी हॉटेल येथील दीक्षांत सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. याचदिवशी दुपारी चार वाजता साळोखेनगर हाऊसिंग सोसायटी येथील कार्यालयाला भेट देण्याचे नियोजन आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता टीए बटालियन स्पोर्टस् परिसराला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता जोतिबा दर्शन घेऊन सोयीनुसार ते पुण्याला रवाना होणार आहेत.
पेठवडगावमध्ये जनावरांचा विनापरवाना औषध साठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पेठवडगाव येथे जनावरांच्या विनापरवाना औषध साठ्यावर धाड टाकून अन्न औषध प्रशासनाने साठा जप्त केला. आलेल्या तक्रारीवर जनावरांची औषधे खरेदी, साठा, वितरण व विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी पडताळणी केली असता, या ठिकाणी विनापरवाना २ लाख ५५ हजार ९०४ रुपयांचा साठा सापडला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त म. न. अय्या यांनी ही माहिती दिली. या कारवाईत औषध निरीक्षक श्रीमती स. सु. घुणकीकर व म. न. अय्या यांनी विश्लेषणासाठी औषध नमुने घेऊन उर्वरित औषध साठा जप्त केला असल्याचेही सांगितले.
काम वाटप समितीची सोमवारी सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था, सुशिक्षित बेरोजगार (स्थापत्य) अभियंते, सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक सोमवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात होत आहे. बैठकीला येताना ज्यांच्या नावे सुबे, मजूर, सर्वसाधारण वर्गातले जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे, त्यांनी स्वत: आपल्या पासबुकसह व मजूर संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांनी आपल्या पासबुकसह हजर रहावे, असे कामवाटप समिती सचिवाने कळवले आहे.