कोल्हापूर : सकाळपासून पडणाऱ्या कोसळधारा झेलत विविध घटकांच्या मोर्चा आंदाेलनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. दलित समाजाच्या स्मशानभूमी प्रश्नी तिरडी मोर्चा, भटके विमुक्तांचा टक्कर मोर्चा, रिपब्लिकन सेनेची वेश्या महिलांच्या पूनर्वसनाची, माकपची पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक होत जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली.
मंगळवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता, त्यातच छत्रपती शासनच्यावतीने मायक्रो फायनान्सविरोधात महिलांचा मोर्चा धडकला. याच दरम्यान संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले, निवेदने दिली. त्यामुळे दिवसभर शासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासनावर मोठा ताण होता. सायंकाळी सहा वाजता महिलांचे आंदोलन मिटल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.
भटके विमुक्त समाजाचा टक्कर मोर्चा
भटके विमुक्त समाजाने टक्कर मोर्चा काढत मौजे टोप पारगाव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजातील ६० कुटुंबांच्या वसाहती, मौ. शिये, (ता. करवीर) येथील वनजमिनीवर राहणाऱ्या हजार कुटूंबांच्या निवाऱ्याचा मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी अध्यक्ष भीमराव साठे, नंदकुमार साठे, आदिनाथ साठे सुरेश महापुरे, पोपटराव लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित महासंघाचा तिरडी मोर्चा
अकलूज (जि.सोलापूर) मध्ये दलित समाजाच्या प्रेतावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापासून रोखण्यात आले. त्याची दखल घेवून जिल्ह्यात स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्यात यावी अन्यथा प्रेत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात येवू असा इशारा देण्यात आला. यावेळी उत्तम मोहिते, पोपट लोंढे, सुधाकर वायदंडे, सनी लिगाडे, वनिता कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पूरग्रस्तांसाठी मार्क्सवादी पक्षाचे निवेदन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या खात्यावर १५ हजार रुपये अनुदान जमा करा, रेशनधान्य, केरोसीन द्या, पूनर्वसनासाठी तयार असलेल्या नागरिकांचे कायमस्वरुपी पूनर्वसन करा, मौजे इिंगळी (ता. हातकणंगले) गावाचा पूरग्रस्त यादीत समावेश करावा मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हा सचिव ए. बी. पाटील, उदय नारकर, सुभाष जाधव, चंद्रकांत यादव उपस्थित होते.
वेश्या व्यवसायापासून परावृत्त झालेल्या महिलांचे पूनर्वसन होण्यासाठी त्यांना घरे किंवा घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली.
---
फोटो नं ०७०९२०२१-कोल-टक्कर मोर्चा०१,०२
ओळ : कोल्हापुरातील भटके विमुक्त समाजातर्फे सोमवारी टक्कर मोर्चा काढून विविध मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
०७०९२०२१-कोल-तिरडी मोर्चा
जिल्ह्यात दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाने बुधवारी तिरडी मोर्चा काढला.