कोल्हापूर : पहिल्या फेरीत प्रवेशित झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग गुरुवारपासून भरले. त्यामुळे शालेय जीवनातून महाविद्यालयीन विश्वामध्ये पहिले पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील काही कनिष्ठ महाविद्यालयांनी बुधवारी, तर काहींनी गुरुवारपासून अकरावीचे वर्ग सुरू केले. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज (कदमवाडी), श्री. तात्यासाहेब तेंडुलकर ज्युनिअर कॉलेज, शहाजी कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, मेन राजाराम ज्युनिअर कॉलेज, महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, गोखले कॉलेजचा समावेश आहे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल गनने तपासणी, आदी नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. कला, वाणिज्य शाखेचे वर्ग सकाळी साडेसात ते पावणेअकरा, तर विज्ञान शाखेचे वर्ग सकाळी साडेअकरानंतर भरविण्यात आले.
एक दिवस आड ५० टक्के विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलविण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. कॉलेज जीवनाची सुरुवात झाल्याच्या आनंदाने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत विद्यार्थी हे कॉलेज कॅम्पसमध्ये फेरफटका मारत होते. त्यामुळे परिसर काहीसा गजबजला होता. काही विद्यार्थी हे प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता करीत होते. उर्वरित महाविद्यालये टप्प्याटप्याने मंगळवार (दि. १५)पर्यंत सुरू होतील.