कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी तुळईस ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मुबीना जँहागीर आंबी (वय २०, रा. फुलेवाडी पहिला बसस्टॉप, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी व सीपीआरमध्ये करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भेट देवून पाहणी केली.पोलीसांनी सांगितले, मुबीना अंबीच्या वडीलांचे वर्षापूर्वी छत्र हरवले. ती घरी आई आणि आजी यांचेसोबत राहत होती. घरची जबाबदारी तिच्यावर होती. शहरातील दसरा चौकातील एका महाविद्यालयात ती वाणीज्य शाखेच्या दूसऱ्या वर्षात शिकत होती. शिक्षण घेत नोकरी करीत होती. आई हॉटेलमध्ये धुण्याभांड्याची कामे करते. आजी खासगी रुग्णालयात काम करते.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी तिची आई कामावर गेली. ती घरी एकटीच होती. आजी खुदेजाबी इब्राहीम आंबी या रात्रड्युटी करुन घरी आल्या. दरवाजा उघडून पाहतात तर मुबीनाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड करताच शेजारील लोक धावत आले.
बेशुध्दावस्थेत त्यांनी तिला सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या मृत्यूने आई व आजी पोरकी झाली. त्यांचा आक्रोश पाहून अनेकांना गहिवरुन आले. मुबीनाने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली.