कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अकरा महाविद्यालयांना कॉम्प्युटर सायन्स्, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ नवीन तुकडी सुरू करण्यास कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आदेश शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने गुरुवारी (दि. ७ डिसेंबर) पारित केला आहे.सद्य:स्थितीत तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य गटातील एकूण १६ द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील पदविकेच्या द्वितीय वर्षामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
या अभ्यासक्रमांची वाढती मागणी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अधिकच्या अथवा नवीन तुकड्या कायमस्वरूपी विना अनुदानित तत्त्वावर सुरू करण्यास इच्छुक असलेल्या संस्थांकडून प्राप्त झालेल्या अर्ज, प्रस्तावांची व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने छाननी केली.
विहीत निकष, मानकांची पूर्तता करणारे प्रस्ताव हे बारावीच्या स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमांच्या नवीन अथवा अधिकच्या तुकड्यांमध्ये कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर सन २०१७-१८ पासून सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील विविध अकरा महाविद्यालयांना कॉम्प्युटर सायन्स्, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ नवीन तुकडी सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
नवीन तुकड्यांची संख्या
- कॉम्प्युटर सायन्स : ६
- क्रॉप सायन्स : ३
- इलेक्ट्रॉनिक्स : ४
मोबाईल अॅप्स् वापरण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. असे अॅप्स्, संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स्, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन यांच्या एकत्रिकरणातून नवी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम पुढे आले आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स विद्याशाखांमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्याशाखांमधील नवीन तुकडी सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता देण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा आहे.- डॉ. आर. के. कामत,विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स्, शिवाजी विद्यापीठ