प्रकाश पाटील
कोपार्डे : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाखरे फाटा येथे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शंकर हरी पाटील (वय-७०, रा. साबळेवाडी ता.करवीर) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पाटील हे वाकरे फाटा पूर्वेला असलेल्या शेतात गेले होते. विहिरीवरील विद्युत पंप सुरू करून ते खुपिरे येथील शेताकडे आपल्या दुचाकीवरून निघाले होते. वाकरे फाट्याच्या पूर्वेला तीव्र उतारावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी रुग्णवाहिका बोलवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.