लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलची घोषणा झाली असून, त्यामध्ये नातीगोती आमनेसामने आली आहेत. नात्यागोत्यातील लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार असून नरके, पाटील-चुयेकर व उदय पाटील-सडोलीकर या घराण्यांतील नाती एकमेकांसमोर ठाकली आहेत.
राजकारणात नात्यागोत्यातील संघर्ष नवीन नाही. सहकारी संस्थांमध्येही एकमेकांविरोधात सख्खे भाऊ, भावजया उभ्या असल्याचे आपण अनेक वेळा पाहिले आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत नात्यागोत्यातील संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. पन्हाळ्यातून चेतन नरके व अजित नरके एकमेकांविराेधात उभे आहेत.
‘गोकुळ’चे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र शशिकांत पाटील हे विरोधी आघाडीकडून, तर त्यांचे मेहुणे प्रतापसिंह पाटील-कावणेकर हे सत्तारूढ आघाडीकडून रिंगणात आहेत. त्याचबरोबर उदय पाटील -सडोलीकर यांच्या चुलत भगिनी या अमरसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. तेही वेगवेगळ्या पॅनलमधून उभे आहेत. शह- काटशहाच्या राजकारणात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोन्याच्या शिरोली उमेदवारीची झळाळी
‘गोकुळ’च्या निवडणुकीत दोन्ही पॅनलमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता फारच धूसर असते. मात्र, सत्तारूढ गटाकडून सोन्याच्या शिरोलीतील राजाराम भाटले व अभिजित तायशेटे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे यंदा सोन्याच्या शिरोलीला उमेदवारीची झळाळी आली आहे.
‘बी.एम.’यांच्या निष्ठेचे ‘रणजित’ना फळ
‘कुंभी’चे माजी उपाध्यक्ष दिवंगत नेते बी.एम. पाटील-साबळेवाडी हे आमदार पी.एन. पाटील यांचे निष्ठावंत होते. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव रणजित हे आमदार पाटील यांच्यासोबत कायम राहिले. त्यामुळेच रणजित यांना उमेदवारी मिळाली असून ‘बी.एम.’ यांच्या निष्ठेचे ‘रणजित’यांना फळ मिळाल्याची करवीरमध्ये चर्चा आहे.