कोल्हापूर : लाल, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा, जांभळा... निसर्गाचे हे सगळे रंग ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कमध्ये अवतरले आणि या रंगांमध्ये रंगून जात बुधवारी (दि. ११) ‘सखीं’नी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला. रंगांची मुक्त उधळण आणि डीजेच्या तालावर धम्माल नृत्यमस्ती करीत सखींनी हा दिवस साजरा केला.आयुष्यातील ताणतणाव, राग, द्वेष, भेद विसरून सगळ्यांना आपल्या रंगात रंगवून टाकणारी रंगपंचमी आज, शुक्रवारी साजरी होत आहे. मात्र त्याआधीच दोन दिवस लोकमत ‘सखी मंच’च्या सदस्यांनी हा रंगोत्सव साजरा केला. तत्पूर्वी ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले.हा रंगोत्सव सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार होता. मात्र १० वाजल्यापासूनच महिलांची पावले ड्रीम वर्ल्डच्या दिशेने येत होती. एकाच वेळी अनेक ठिकाणी नोंदणीसाठी टेबल मांडून सखींसाठी सोय करण्यात आली.प्रवेशद्वारातच मांडलेल्या कटआउट्स आणि आकर्षक सजावटीने उत्साह दुणावत होता. आत आल्यानंतर सखींसाठी रंग आणि खेळण्यासाठीच्या साहित्याची सोय ‘सखी मंच’कडूनच करण्यात आली होती. शिवाय चमचमीत खाद्यपदार्थ होते. डीजेच्या संगीतावर थिरकणारी पावले, कलर ब्लास्टमधून उधळणारे रंग, भर उन्हाळ्यात पावसाचा अनुभव देणारा रेन डान्स असा हा धमाल सोहळा सायंकाळपर्यंत सुरू होता. या रंगोत्सवाच्या सुखद आठवणी घेऊन सखी घरी परतल्या.फोम मशीनची जादूया रंगोत्सवासाठी फोम मशीन्सही ठेवण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा या लाही लाही करणाऱ्या वातावरणात फोममशीनमधून अंगावर पडणारा फेस जणू बर्फाळ प्रदेशात असल्याचा भास निर्माण करीत होता. तळपत्या उन्हातही ड्रीमवर्ल्डमध्ये पडणारा हा बर्फाचा पाऊस सखींना गारवा देत होता. हा पाऊस अंगावर घेण्यासाठी सखींची झुंबड उडाली होती.कलर ब्लास्ट... कलर गनसखींना या रंगोत्सवाचा मुक्त आनंद घेता यावा यासाठी कलर ब्लास्ट व कलर गनचीही सोय होती. या गनमधून उधळणारे रंग सखींना आपल्या रंगात रंगवून टाकत होते. महिलांसोबत बच्चे कंपनी मुद्दाम या कलर ब्लास्टजवळ थांबून रंगत होत्या.रेन डान्स... डीजेची धमालएकीकडे रंगांची उधळण, दुसरीकडे डीजे रणवीरचे गीतांच्या तालावर नृत्य आणि पलीकडे पावसाचा आभास देणारा रेन डान्स सुरू होता. सखींचा मूड क्षणाक्षणाला बदलविणारे संगीत आणि झुंबा डान्सर शेफाली मेहता यांच्या डान्सिंग स्टेप्स यावर महिलाही थिरकत होत्या. रोजच्या धावपळीत महिलांना मोकळेपणाने नृत्य करण्याची संधी मिळत नाही; पण या रंगोत्सवाच्या निमित्ताने लहान मुलींपासून ते युवती, गृहिणी अगदी वयोवृद्ध आजींनीही जमेल तसा डान्स करीत आपली हौस पूर्ण करून घेतली.खवय्यांसाठी खाऊगल्लीया उत्सवासाठी येणाºया सखींसाठी खास मेनूही ठेवण्यात आला होता. दिवसभर रंगात खेळून भूक लागली की वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ सगळ्यांच्या जिभेचे चोचले पुरवीत होते. चौपाटी पदार्थ, चायनीज या पदार्थांनी खवय्यांनाही मनसोक्त मेजवानी दिली. सोबत खायला पानही होते.