निवास वरपे, लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : संपूर्ण राज्याला पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श देणारे करवीर तालुक्यातील सोनाळी हे तुळशी नदीच्या काठावरील सतराशे लोक वस्तीच छोटस खेडेगाव. या गावात गेल्या ७५ वर्षापासून रंगविरहित शाडू मातीच्या गणेश मूर्ती प्रत्येकाच्याच घरी बसविल्या जातात. तर गेल्या तीस वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव येथे सुरू झाला. त्या मंडळांच्या मूर्तीही रंगविरहित शाडू मातीच्याच आहेत. डॉल्बी मुक्ती व निर्मल्याची सुव्यवस्थित विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील ग्रामस्थांनी चालवली आहे.
सोनाळी गावचे ग्रामदैवत 'धाकेश्वर' आहे. पारंपारिक प्रथा परंपरेने गावात सर्व सण उत्सव साजरे केले जातात. मात्र ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसविलेला चालत नाही,अशी आख्यायिका आहे. देवाचा कोप होऊ नये या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी गणरायाच्या रंगीत अथवा प्लास्टरच्या गणेश मूर्ती बसवतच नाहीत. धाकेश्वर व जय शिवराय तरुण मंडळानी गेल्या ३० वर्षापासून शाडू मातीच्या पाच ते सहा फूट उंचीच्या गणेश मूर्ती बसवण्याची प्रथा अखंडित सुरू ठेवली आहे.
दुग्ध व्यवसाय व शेती हा येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय. डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील निम्म्याहून अधिक शेती कोरडवाहू आहे. येथील महिला बचत गट व तरुण मंडळांच्या माध्यमातून झांजपथक, ढोल ताशे, लेझीम मंडळ व भजनी मंडळ चालवली जातात. इको फ्रेंडली व पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरी करण्याची येथील प्रथा सर्व दूर पसरल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कडून सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, व्याख्याने, महाप्रसाद व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील जुन्या जाणत्या महिलांचा आदर्श घेऊन महिला वर्ग गौरी आवाहन व विसर्जनादरम्यान रीतीरीवाद परंपरा सांभाळत प्रदूषण मुक्तीचा वसा निर्माण करतात.
शेजारील म्हालसवडे गावातील कुंभार बलुतेदारी पद्धतीने शाडू मातीच्या गणेश मूर्ती संपूर्ण सोनाळी गावाला पुरवितात. गणेश मूर्तीची पैशातून किंमत न करता बलुतेदारी पद्धतीने सुगीच्या वेळी धान्य स्वीकारले जाते.
गावातील प्रत्येकाच्या घरी पिढ्यानपिढ्या गणेशोत्सवामध्ये शाडू मातीच्या गणपतीची स्थापना केली जाते. रंगविरहित गणेशाचे पूजन केल्याने भक्ती भाव कमी पडत नाही. प्रदूषण मुक्तीसाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही प्रयत्नशील आहोत. निर्माल्यदान व मूर्तीदान हा उपक्रमही हाती घेतला असून संपूर्ण राज्यातील जनतेने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा आमचा आदर्श घ्यावा. - विजया सुरेश पाटील - सरपंच - सोनाळी