कोल्हापूर : छगन भुजबळ यांनी पुड्या न सोडता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी खुली चर्चा करण्यासाठी कोल्हापूरच्या बिंदू चौकात यावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेर्धात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने येथील दाभोळकर कॉर्नरला चक्का जाम करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे आव्हान दिले.
पाटील म्हणाले, ५० टक्क्यांवर आरक्षण गेल्यानंतरही फडणवीस सरकारने हे आरक्षण टिकवले होते. त्यानंतर आमचे सरकार गेले. सर्वाेच्च न्यायालयाने १५ वेळा सांगूनही आकडेवारी उपलब्ध करून दिली नाही. प्रत्येक वेळी तारीख मागत राहिलात. तुम्ही त्याचे कायद्यात रूपांतर केले नाही. मराठा समाजाचा घात तुम्ही केलात, ओबीसी समाजाचा घात तुम्ही केलात, तेव्हा बिंदू चौकात या. नेमकी कुणी फसवणूक केली ते कळू द्या.
माजी खा. धनंजय महाडिक म्हणाले, ओबीसी समाजाने आता काँग्रेसला जाब विचारला पाहिजे. कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विरोधात का काँग्रेसच्या आमदाराच्या मुलाने आणि एका काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्षाने याचिका दाखल केली होती. म्हणून हा घोळ झाला. निष्क्रियतेबद्दलचे एखादे पारितोषिक या सरकारला द्यायला हवे.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांनी भूमिका मांडली. सुमारे तासभर या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. माजी आ. अमल महाडिक, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, सुनील कदम, महेश यादव, विद्या बनछाेडे, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय पाटील यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
२६०६२०२१ कोल बीजेपी आंदोलन ०१
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेर्धात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने शनिवारी सकाळी दाभोळकर कॉर्नरवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
(छाया : आदित्य वेल्हाळ, मीलन मकानदार)