कोल्हापूर : देशात शांतता आणि जातीय सलोखा नांदण्यासाठी ‘मानव एकता मिशन’तर्फे ‘आशा पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आशा पदयात्रेची कोल्हापूर शहरातील सुरुवात आज, मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता दसरा चौकातून होणार आहे. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा श्री अंबाबाई मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता करवीरपीठात सत्संग कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती या पदयात्रेचे प्रमुख श्री. एम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहरात आशा पदयात्रेचे आमगन सोमवारी झाले. शिवाजी विद्यापीठ रोडवरून सायबर चौकामार्गे ही पदयात्रा शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी या यात्रेतील सहभागींचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी शाहू स्मारक भवन येथे संवाद साधताना एम. बोलत होते. एम. म्हणाले, कोल्हापूर हे सर्वधर्मभावाचे केंद्र आहे. राजर्षी शाहू महाराजांनी येथे विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे, येथील जैन मठ आणि मशिदी या सर्वधर्मभावाची साक्ष देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील पदयात्रेची सुरुवात कोल्हापुरातून सुरू करताना आनंद होत आहे. आशा पदयात्रेचा प्रारंभ १२ जानेवारी २०१५ ला कन्याकुमारी येथून माजी केंद्रीय मंत्री डॉ. करण सिंग यांच्या हस्ते झाला. कन्याकुमारी ते काश्मीर हा या पदयात्रेचा मार्ग आहे. यामध्ये सुमारे १५० जण सहभागी झाले आहेत. आतापर्यंत ही पदयात्रा २२०० किलोमीटरचा प्रवास करत महाराष्ट्रात शनिवारी (दि. १६) पोहोचली आहे. आंतरधर्मीय ऐक्य, महिला सबलीकरण , आरोग्य आणि शिक्षण व युवकांचा विकासाचा जागर करत ही यात्रा काश्मीरपर्यंत पोहोचणार आहे. यावेळी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. चंद्रकांत पांडव, कर्नाटकच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव तारा सिंग, माजी पोलीस महासंचालक अजयकुमार सिंग , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, मानव एकता मिशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दीपक खडके उपस्थित होते. ( प्रतिनिधी )शहरात भव्य स्वागत आशा पदयात्रेचे शिवाजी विद्यापीठ रोड येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा सायबर चौकामार्गे शाहू स्मारक भवनात आली. या ठिकाणी झालेल्या स्वागताच्या कार्यक्रमात करवीरपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्यानृसिंह भारती, जैन मठाचे लक्ष्मीसेन महाराज यांनी आशा पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी पदयात्रेदरम्यान विविध राज्यांतून येत असताना, तेथील सांस्कृतिक विविधता आणि यात्रेचे स्वागत दाखवणारा स्लाईड शो दाखविण्यात आला.
मानवतेसाठी चले चलो
By admin | Published: May 18, 2015 11:36 PM