शिरोली : ट्रेलरचे बंद पडलेले पासिंग पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र अॅग्रिकल्चर इम्पलीमेंट्रस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले. ते असोसिएशनच्या सभेत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया अॅग्रिकल्चरचे सुरेंद्रसिंग होते. पाटील म्हणाले, ट्रेलरचे पासिंग ३१ आॅगस्टला बंद झाले आहे. पासिंग सुरू करण्यासाठी फक्त काही उद्योजकच आग्रही आहेत. बाकींच्या उद्योजकांना याचे कोणतेही देणे-घेणे नाही. पासिंग सुरू करण्यासाठी सर्वच उद्योजकांचा सहभाग आवश्यक आहे. ट्रेलरला ब्रेक सिस्टीम बसवावी, असा आदेश केंद्रीय दळणवळण व प्रादेशिक परिवहन सचिवांचा आहे. उद्योजकही ब्रेक सिस्टीम लावायला तयार आहेत, पण ट्रॅक्टर कंपन्यांनी ब्रेक सप्लाय पॉर्इंटच अद्याप काढलेले नाही. ट्रॅक्टरचे पासिंग शासनाने थांबवणे गरजेचे असताना ट्रेलरचे पासिंगच विनाकारण थांबविले आहे. यामुळे राज्यातील ट्रेलर उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे पासिंग सुरू करावे यासाठी १९ आॅगस्टला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाली असून त्यांनी यावर योग्य मार्ग काढू, असेही सांगितले आहे, पण यासाठी राज्यातील सर्व उद्योजकांचा सहभाग पाहिजे तरच ताकद लावून हे पासिंग पुन्हा सुरू होऊ शकते, असेही पाटील म्हणाले. या बैठकीला असोसिएशनचे सचिव व्यंकटराव मोरे, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, सचिव दत्तात्रय हजारे, प्रकाश कुंभार, राजेंद्र मणियार, बंटी निकम, दीपक जाधव, बाबूराव हजारे, राहुरी कृषी विद्यापीठचे प्रकाश तुरमटकर, पुणे कृषी विद्यापीठचे एन. व्ही. राणे, श्रीकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ट्रेलर उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)
ट्रेलरच्या पासिंगसाठी एकत्र या
By admin | Published: September 15, 2014 12:39 AM