सातारा : कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून नागरिकांना घरात बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाला जवळून अनुभवणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था कोणी जाणली नाही. या अधिकाºयांनाही त्यांच्या मुलांची चिंता लागली आहे. दिवसभर अनेक रुग्णांशी संपर्क येत असल्याने संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत आहे. यदाकदाचित आपल्यामुळे आपल्या मुलांनाही संसर्ग होऊ नये, याची धास्ती त्यांना वाटू लागलीय.
संसर्गजन्य रोगावर उपचार करणारे पथक जीव धोक्यात घालून उपचार करत आहे. मुंबई, पुण्याहून येणाºया नागरिकांना तपासले जात आहे. कधी कोणत्या रुग्णाला कोरोनाची बाधा झालेली असेल, हे सांगता येत नाही. प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय अधिकाºयांना तपासावे लागत आहे. विशेषत: परदेशातून आलेल्या नागरिकांना तपासताना डॉक्टरांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. अशा रुग्णाला तपासण्यापूर्वी आणि तपसल्यानंतर अंगावरील कपडे निर्जंतुक करावी लागत आहेत. दिवसातून कमीत कमी सहा ते सातवेळा त्यांना कपडे निर्जंतुक करावी लागत आहेत. सकाळी सातला घरातून बाहेर पडलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी संध्याकाळी आठला घरात येत आहेत. घरात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ धूत आहेत. मात्र, तरी सुद्धा त्यांच्या मनात कुठेतरी चिंतायुक्त भीती आहे.
घरात गेल्यानंतर छोट्या मुलाला उचलून घ्यावं, असं त्यांना वाटतं. परंतु खबरदारी म्हणून लहान मुलांपासून दूर राहण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे. इतर दिवशी ज्या पद्धतीने रुग्णालयातून घरी आल्यानंतर मनात कोणतेच विचार नसायचे. मात्र, कोरोनामुळे बरेच चिंताग्रस्त विचार मनात येत असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रुग्णांची सेवा करणे, हे आमचं प्रथम कर्तव्यच आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून आम्हाला रुग्णांची सेवा करणे भागच आहे, असंही वैद्यकीय अधिकाºयाने बोलून दाखवलं.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांची याहून अवस्था बिकट आहे. सध्या मुंबई, पुणे तसेच परदेशातूनही अनेकजण आपापल्या गावी येत आहेत. अशा लोकांची तपासणी करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाºयांवर सोपविण्यात आले आहे. या अधिकारी व कर्मचाºयांना रोज चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रवास करावा लागतोय. त्यांच्यासोबत परिचारिकाही असतात. या सर्वांच्या सुट्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.घरातून सुटी घेण्याचा आग्रह..कोरोनाची धास्ती डॉक्टरांच्या घरातल्यांनीही घेतली आहे. सुटी काढून घरी थांबा, असे वैद्यकीय अधिकाºयांना घरातून आग्रह होऊ लागला आहे. मात्र, तरीही जनतेच्या सेवेसाठी सर्वच डॉक्टर चोवीस तास तत्पर राहत आहेत.