राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील रस्त्यांवर खड्ड्यांचे अक्षरश: साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, हेच येथील व्यापाऱ्यांना कळत नसून, वाहनचालक हैराण झाले आहेत. समितीचे वार्षिक १६ कोटींचे उत्पन्न असतानाही रस्त्यांसाठी पैसे मिळेनात. सगळीकडे पाण्याची डबकी, कचऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.
करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा व निम्मा कागल असे साडे सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समिती पश्चिम महाराष्ट्रातील मोठी समिती आहे. येथे गुळाची मुख्य बाजारपेठ असली तरी कांदा, बटाटा, फळे-भाजीपाल्यातून मोठे उत्पन्न मिळते. येथे कांदा व बटाट्याचे एक पोतेही उत्पादन होत नसताना कोट्यवधीचा सेस या विभागातून समितीला मिळतो. समितीला मार्केट फीच्या माध्यमातून १२ कोटी तर उर्वरित इमारत भाडे, वाहन प्रवेश फी या माध्यमातून साडे चार ते पाच कोटी असे १६ कोटीचे उत्पन्न वर्षाला मिळते; मात्र त्या पटीत सुविधा दिल्या जात नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे.
समितीच्या अंतर्गत रस्त्यांसह त्यांना जोडणाऱ्या बोळांची दयनीय अवस्था झाली आहेच, त्याचबरोबर समितीमध्ये प्रवेश करतानाच खड्ड्यातूनच करावा लागतो.
पाण्याच्या डबक्यांनी साथीच्या आजाराची भीती
गुळ सौदे विभाग, फळे-भाजीपाला व मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या बोळात घाणीचे साम्राज्य आहे. रस्ते व प्लॉटच्या समोरच पाण्याची डबकी साठत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये साथीच्या आजाराची भीती आहे.
नाईट वॉचमनही शतक मारतो
अशासकीय मंडळ येऊन जवळपास वर्ष होत आहे; मात्र येथे व्यापाऱ्यांना प्राथमिक सुविधा देण्यास सदस्यांचा हात कायमच आखडता राहिला आहे. त्यातही आपण काय नाईट वॉचमन म्हणून आलो आहे, पुढे येणारे कारभारी करतील की, अशी वक्तव्य अशासकीय मंडळाचे प्रमुखच करत आहेत; मात्र क्रिकेटमध्ये नाईट वाॅचमन म्हणून पाठवलेला खेळाडू शतक मारतो, याचा विसर कदाचित प्रमुखांना पडल्याचे दिसते.
डुकरांनी व्यापारी हैराण
बाजार समिती आवारात मोकाट डुकरांची संख्या मोठी आहे. भाजीपाला, कांदा-बटाट्यासह इतर मार्केटमध्ये डुकरांचा त्रास मोठा आहे. थेट शेतीमालामध्ये घुसत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत; मात्र समिती प्रशासन त्यावर काहीच उपाय योजना करत नाही.
लिगाडे गल्लीने डांबरच पाहिलेले नाही
पूर्वी गुळाचे सौदे व्हायचे ते लिगाडेसह त्या पलीकडील गल्लीने, तर अद्याप डांबरच पाहिलेले नाही. येथे व्यापाऱ्यांचे गोडावून असल्याने अवजड वाहतूक कायम होते. या दलदलीतून वाहने चालवताना कसरत करावी लागते.
(फोटो ओळी स्वतंत्र देत आहे.....)