चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत-अथर्व इंटरट्रेड कंपनीला सन २०२१-२२ या हंगामासाठी ऊस पुरवठा करण्यासाठी शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तोडणी-वाहतूक कराराचा प्रारंभ कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांच्या हस्ते झाला.
तोडणी वाहतूक कंत्राटदार प्रतिनिधी यांनी लक्ष्मी प्रतिमापूजन केले. यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले, गेल्या हंगामात तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या सहकायार्मुळेच ४.३१ लाख टन उसाचे गाळप होऊन हंगाम यशस्वी झाला. या हंगामातही चांगले सहकार्य करून जास्तीत जास्त उसाचा पुरवठा कारखान्यास करावा.
शेतकरी, तोडणी-वाहतूक यंत्रणेच्या सहकार्यावर व्यवस्थापनाने ६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन व्यवस्थापनाखाली कारखान्याचे आजवर केवळ दोनच हंगाम पूर्ण केले असूनही इतक्या अल्प कालावधीत कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.
गेल्या हंगामातील ऊस उत्पादकांची, तसेच तोडणी वाहतूक कंत्राटदारांची सर्व बिले कारखान्याने यापूर्वीच अदा केली असून, असे करणारा या भागातील हा पहिलाच कारखाना असावा, असे खोराटे म्हणाले.
तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या कमिशन व डिपॉझिटची रक्कमही येत्या १७ तारखेस संबंधितांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाईल. सध्याच्या काळात फक्त साखर उत्पादनावर कारखाना चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने उप-पदार्थ निर्मिती करून उत्पन्नाचे स्रोत वाढविणे आवश्यक आहे. म्हणूच कारखान्याने डिस्टिलरीच्या आधुनिकीकरणाचा इथेनॉलनिर्मिती प्रकल्प हाती घेतल्याचे खोराटे यांनी सांगितले.
भविष्यातही आणखी काही प्रकल्प हाती घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, तसेच कामगार यांनाही त्याचा आर्थिक लाभ होऊ शकेल.
यावेळी संचालक पृथ्वीराज खोराटे, युनिट हेड धनंजय जगताप, केन व्यवस्थापक एस. एन. गदळे, फायनान्स व्यवस्थापक बी. एन. कदम, एच.आर. व्यवस्थापक जी. एस. पाटील, अधिकारी, कर्मचारी व तोडणी वाहतूकदार उपस्थित होते.
फोटो ओळी : हलकर्णी (ता. चंदगड) येथील 'दौलत-अथर्व'च्या कार्यस्थळावर सन २०२१-२२ हंगामासाठी तोडणी-वाहतूक करार शुभारंभप्रसंगी अध्यक्ष मानसिंग खोराटे, संचालक पृथ्वीराज खोराटे, युनिट हेड धनंजय जगताप उपस्थित होते.
क्रमांक : १४०५२०२१-गड-०३