कोल्हापूर : मन प्रसन्न करणारे मंजूळ सूर, निसर्गाची किमया एकवटलेल्या विविधरंगी फुला-पानांची सजावट, दिव्याची मंद ज्योत, मंगलमयी वातावरण, जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत आज, शनिवारी ‘लोकमत’चे संस्थापक, जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला. सत्य आणि सत्यच वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या लोकमत परिवारावरील विश्वास आणि नात्याची वीण अधिक घट्ट करत समाजाच्या सर्वच स्तरातील मान्यवरांनी जवाहरलाल दर्डा यांच्या कार्यास कृतज्ञ अभिवादन केले. यानिमित्ताने दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ झाला.महाराष्ट्रातील नंबर एकचे वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’बद्दल वाचकांच्या मनात जे स्थान अबाधित आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष बातमीदारी, सत्यता, अचूकतेबाबत जो विश्वास आज लाखो वाचकांच्या मनात आहे त्याची मुहूर्तमेढ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी रोवली. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले असताना याच योगावर आलेले त्यांचे जन्मशताब्दी वर्ष, वाचक आणि लोकमतमधील नात्याचा धागा अधिक घट्ट करणारे ठरले.लोकमतच्या शहर कार्यालयात शाहू छत्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव व्ही. एन. शिंदे, जीएसटी विभागाच्या सहायक आयुक्त सुनीता थोरात,गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, दैनिक पुढारीचे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे, ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, बाळ पाटणकर, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार आदी उपस्थित होते. लोकमतचे संपादक वसंत भोसले, सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासन अशा सर्वंकष क्षेत्राचा दांडगा व्यासंग होता. त्यांनी ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम केले, १२ खाती सांभाळली. अनेक संस्थांशी ते जोडले गेले होते, त्याची सुरुवात विदर्भ मराठवाड्यापासून झाली असली तरी आता पश्चिम महाराष्ट्रदेखील व्यापला आहे. लोकमतचा महाराष्ट्रभर विस्तार झाला आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही चांगल्या -वाईट घडामोडी मांडण्याचा प्रयत्न करत असतो.वाचक, शासन, प्रशासनातील दुवा आणि आपत्तीच्या काळात खंबीर साथ देत जवाहरलालजी दर्डा यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर लोकमतची वाटचाल सुरू आहे. आपले सर्वांचे पाठबळ असेच कायम राहू दे. यानंतर अभिवादनाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, उद्योग, व्यापार, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लोकमत’बद्दल गौरवोदगार..
‘लोकमत’मध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि स्थानिक बातम्यांचा समतोल अतिशय चांगला साधला जातो. त्यामुळे लोकमत दिवसेंदिवस वाचकप्रिय होत आहे. पारंपरिक पत्रकारितेहून अधिक वेगळे काही लोकमत करत असल्याच्या भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केल्या. लोकमतला वाचकांकडून सध्या जो प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामागे ही गुणवत्ता असल्याचेही अनेकांनी आवर्जून सांगितले. कुठेही गेले तर ‘लोकमत चांगला निघतो हं’ ही भावना लोकांतून व्यक्त होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अभिवादनासाठी गर्दीअभिवादनाच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंतची होती; पण त्याआधीपासूनच बाबूजींना अभिवादन करण्यासाठी मान्यवरांची गर्दी सुरू होती. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून अगदी सायंकाळपर्यंत वाचक उत्स्फूर्तपणे ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात येत होते.
मंगलमय वातावरण..
वृत्तपत्राच्या कार्यालयात दैनंदिन घडामोडी आणि बातम्यांच्या धकाधकीचा ताण असतो; पण शनिवारी लोकमतच्या शहर कार्यालयात समारंभाचे मंगलमय वातावरण होते. प्रवेशद्वारापासूनच रेखाटलेली सुंदर रांगोळी, कार्यालयाला फुलांची सुंदर सजावट, आकर्षक फुलांची सजावट आणि मध्यभागी बाबूजींचे छायाचित्र, सोबतीला मंजूळ संगीत आणि सुगंधाने भारलेल्या वातावरणात हृद्य सोहळा रंगला.