आजरा : आजरा साखर कारखान्याकडे ऊसतोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. ऊस तोडणीसाठी कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेरचे ऊसतोडणी वाहतुकीचे करार करण्यासाठी नियोजन केले आहे. ऊसतोडणी वाहतुकीसाठी आज २७८ वाहनधारक कंत्राटदारांनी करार करण्याची तयारी दर्शवली आहे. संचालक एम. के. देसाई यांनी स्वागत केले.
आजरा साखर कारखाना आर्थिक अडचणीमुळे गेली दोन वर्षे बंद होता. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, संचालक मंडळ व आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सहकारी संस्थेच्या सहकार्यातून जिल्हा बँकेचे थकीत कर्ज पूर्ण भरून कारखाना स्वबळावर चालविण्याचा निर्धार केला आहे. त्याला अनुसरून कार्यक्षेत्रातील ऊस नोंदीचे करार सुरू केले आहेत.
आगामी गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कार्यक्षेत्र आणि कार्यक्षेत्राबाहेरील तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांनी पूर्वीप्रमाणेच कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. या वेळी वाहतूक कंत्राटदार गणपतराव डोंगरे यांनी पूर्ण क्षमतेने ऊसपुरवठा करण्याची ग्वाही दिली. २०२१-२२ चा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात सहकार्य करावे व आजरा कारखान्याकडे काम करू इच्छिणाऱ्या अन्य कंत्राटदारांनी शेती विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. शिंत्रे यांनी केले.
या वेळी संचालक मुकुंद देसाई, अंजना रेडेकर, सुधीर देसाई, राजेंद्र सावंत, दशरथ अमृते, अनिल फडके, आनंदा कांबळे, तोडणी कंत्राटदार एकनाथ पाटील, महादेव गुरव, विजय नेवगे, विकास पाटील यांच्यासह कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण, खातेप्रमुख, शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : आजरा साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक कराराचे पत्र ठेकेदार गणपतराव डोंगरे यांना देताना मुकुंद देसाई. शेजारी अध्यक्ष सुनील शिंत्रे, अंजना रेडेकर यांच्यासह संचालक मंडळ.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०८