लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भातबियाणे केंद्रांवरती भात खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राधानगरी कृषी विभागाने चांगला उपक्रम हाती घेतला. शेतकऱ्यांना थेट बांधावर खते व भात बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोते पैकी गोतेवाडी (ता. राधानगरी) येथील काही शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात काल भात बियाणांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांना भात बीजप्रक्रियेची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना या विभागाचे कृषी सहायक टी. जी. परीट व कृषिसेवक उमेश नाधवडेकर यांनी भात उगवण क्षमता चाचणी, रासायनिक खतांचा वापर, माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन इत्यादींची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचबरोबर रासायनिक खताचा दहा टक्के कमी वापर करावा, माती परीक्षणानुसार खताचा वापर, रासायनिक खतांबरोबर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत व हिरवळीचे खते कशी? व का ? वापरावयाची व त्याचे फायदे याही घटकांचे सादरीकरण शेतकऱ्यांसमोर करण्यात आले.
दरम्यान, खामकरवाडी येथे भातबीज प्रात्यक्षिक वेळी बियाण्यांवरती बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. या वेळी कृषी सहाय्यक टी. जी. परीट, राहुल चौगुले, कृषिसेवक उमेश नाधवडेकर, कृषिसेवक संजय सुरडकर, कृषी सहाय्यक उदय नाईक, खामकरवाडीच्या सरपंच सखूबाई खामकर, ग्रामपंचायत सदस्या छाया गोते, वैभवी वडाम, मधुकर गोते, सुभाष गोते, बळवंत मरळकर उपस्थित होते.
फोटो ओळी : कोतेपैकी गोतेवाडी (ता. राधानगरी) येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक तानाजी परीट व इतर.