कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स या शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्याचा स्रेहमेळावा दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे, विविध कार्यक्रमाच्या आयोजनासह कॉलेजमधील जुन्या आठवणींना माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांकडून उजाळा देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रमोद जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज आॅफ कॉमर्स या शिक्षण संस्थेची स्थापना १९५७ मध्ये झाली. कॉलेजमधून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त करून पुढे ते विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचे संघटन होऊन, कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कॉलेज स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी होत आहे.सोहळ्यात, विविध क्षेत्रांत कर्तृत्व मिळविलेल्या माजी विद्यार्थ्यांचा, तसेच माजी प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता भवानी मंडप येथून माजी विद्यार्थ्यांच्या रॅलीने स्नेहमेळाव्यास प्रारंभ होईल.
रॅली प्रमुख मार्गावरून फिरून कॉमर्स कॉलेजमध्ये येईल. तेथे रक्तदान शिबिर, रिफ्रेशमेंट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे. मेळाव्यात सहभागासाठी वेबसाईटवर, तसेच आॅफलाईन नोंदणी सकाळी १० ते ३ पर्यंत कॉलेजमध्ये करण्यात येत आहे.या पत्रकार परिषदेस कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य व्ही. ए. पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे मनीष झंवर, हेमंत पाटील, प्रवीण गुहागरकर, रवींद्र खेडेकर, शिवा यादव, अनिल फातले, नरेंद्र काळे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आठवणींतील वर्ग...माजी विद्यार्थ्यांची रॅली कॉलेजमध्ये आल्यानंतर तेथे माजी विद्यार्थ्यांनी, तसेच माजी शिक्षकांनी त्यावेळचा आपला वर्ग शोधून त्या वर्गात एकत्रित बसून काही वेळ जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्रेह वाढविण्यात येणार आहे.