कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात ''माधव रसायन'' ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ यांच्या प्रेरणेने व संशोधन समिती प्रमुख वैद्य जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विश्ववती आयुर्वेद संशोधन केंद्राने संशोधित केलेले ‘माधव रसायन आयएल-६’ हे कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे संशोधन समिती प्रमुख प्रख्यात वैद्य समीर जमदग्नी व संशोधन समिती सदस्य डॉ. शैलेश मालेकर यांनी सांगितले.
ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर म्हणाले, ‘आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णांना फायदा होतो असे अनुभव आहेत त्याला प्रयोगशालेय संशोधनाची जोड देत औषधांच्या कार्यप्रणालीवर प्रकाश टाकणे ही काळाची गरज आहे.’ वैद्य समीर जमदग्नी म्हणाले , ‘पूर्णतः आयुर्वेदीय सिद्धांतांचा विचार करून संशोधित केलेल्या या औषधाची उपयोगिता आधुनिक निकषांवरही सिद्ध होत आहे याचे वेगळे महत्त्व आहे.
कोरोना रुग्णांना व योद्धांना या औषधांचा मोठा लाभ झाला आहे. त्याचीच पुष्टी करण्यासाठी माधव रसायनच्या काही प्रयोगशालेय संशोधनांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. दिल्लीतील जामिया हमदर्द अभिमत विद्यापीठाच्या औषधी जैवतंत्रज्ञान संस्थेत हा प्रयोगशालेय संशोधनाचा प्रकल्प पूर्ण झाला. ‘इंटरल्युकीन-६’ हा कोविडच्या तीव्रतेसाठी सर्वाधिक महत्त्वाचा सायटोकाईन घटक कमी करण्यासाठीची ''माधव रसायन''ची उपयुक्तता जामियाचे प्रा. डॉ. पांडा यांच्या नेतृत्वात झालेल्या या प्रयोगात सिद्ध झाली. या आजारात काही विशिष्ट सायटोकाईन्सच्या अतिरिक्त स्रावामुळे हे रुग्ण गंभीर होतात हे स्पष्ट झाले आहे. कोविडची तीव्रता, आयसीयू , व्हेंटिलेटरची गरज लागणे, फुफ्फुसे निकामी होणे व मृत्युदर या साऱ्यांचा ‘इंटरल्युकीन-६’ या घटकाशी असणारा थेट संबंध जगभरातील विभिन्न संशोधनातून सिद्ध झाला आहे.