कोल्हापूर : नैसर्गिक आपत्ती व इतर बाह्य कारणांमुळे थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राने महाराहत ही नवीन कर्ज परतफेड योजना आणली आहे. ३१ मार्च २०२० ला शेती अनुत्पादक झाली आहे, ज्यांच्याकडे १० लाखांपर्यंतचे कर्ज येणे बाकी आहे, असे सर्व खातेदार या नव्या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
कुठल्याही तडजोड योजनेंतर्गत लाभ घेतलेले कर्जदार त्या बँकेकडून पुन्हा कर्ज घेण्यासाठी अपात्र ठरतात; परंतु या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जाणार आहे. या योजनेंतर्गत संचित व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून कर्ज बाकीवर आकर्षक सूटही दिली जाणार आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया यांनी केले आहे.