कोल्हापूर : तब्बल दहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे रविवारी (दि. २७) ढोलकीवर थाप पडणार आहे. यानिमित्ताने लावण्यवतींच्या घुंगरांची छमछम, नखरेल अदा आणि लावणीचा ठसका कोल्हापूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या करते तुम्हा मुजरा या ‘लावणी शो’ने दुपारी साडेचार वाजता हा रंगमंचीय पडदा उघडणार आहे.
कोरोनामुळे गेले दहा महिने सर्व सांस्कृतिक घडामोडी बंद होत्या. त्यामुळे कलाकारांसह कामगारांची आर्थिक स्थिती बिकट होती. आता मात्र नव्याने कलाक्षेत्राची नांदी होत आहे. तब्बल दहा महिन्यांनंतर होत असलेल्या या लावणी शोमध्ये लावण्यवती स्मृती व ऐश्वर्या बडदे यांच्यासह नृत्यांगना थिरकणार आहेत. त्यांनी अकलूज लावणी महोत्सवात सलग पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्कसह सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात येणार आहे. तरी रसिकांनी या शोचा आनंद घ्यावा, असे आवाहन गायकवाड पब्लिसिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
--