कोल्हापूर : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेटी दिल्या. पॉझिटिव्ह रुग्णांशी थेट संवाद साधत सुविधांबाबत विचारपूस केली रुग्णांना चांगले जेवण, चांगली सुविधा देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये वॉर्डबॉयने अलगीकरण कक्षातील अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची तक्रार राजारामपुरी पोलिसांत दाखल झाली. यानंतर शहरातील अलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटर चर्चेचा विषय ठरले. या सर्व पार्श्वभूमीवर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडा पार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटरला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक भेट दिली. त्यांनी तेथील पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधला. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांबाबत चर्चा केली. सेंटरवरील सुविधेबाबत त्यांच्या काही सूचनाही ऐकून घेतल्या.
या ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ज्याप्रमाणे आहार दिला जातो, त्याप्रमाणे येथील रुग्णांनाही आहार देण्याच्या सूचना नोडल ऑफिसर यांना केल्या. शौचालयांची व इतर स्वच्छता दैनंदिन होते का नाही, याची चौकशी केली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता टी. एस. कांबळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, आदी यावेळी उपस्थित होते.दर जास्त घ्या; पण जेवण चांगले द्यारुग्णांना पोषक आहार द्या, ठेकेदारला प्रतिप्लेट २५ रुपये वाढवून द्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.साहेब, तुम्ही देवमाणूसस्वच्छता अभियानामुळे आयुक्त घराघरांत पोहोचले आहेत, त्यांच्याबद्दल कोल्हापूरकरांमध्ये आयुक्तांना आदराचे स्थान आहे. डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये याची पुन्हा एकदा प्रचिती आली. येथील रुग्णाने साहेब, तुम्ही देवमाणूस आहात. आमचे प्रश्न सुटले. इथे काही अडचण नाही, असे सांगितले. आयुक्त लोकांसाठी रात्रंदिवस काम करीत असल्याची भावनाच त्यातून व्यक्त झाली.