कोल्हापूर : शहरातील कोणत्याही मिळकतधारकांचा घरफाळा वाढविण्यास आमचा ठाम विरोध आहे. आम्ही प्रशासनाचा प्रस्ताव एकमताने हाणून पाडू; परंतु तरीही जर आयुक्तांनी घरफाळा वाढविण्याचा निर्णय त्यांच्या अधिकारात घेण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांना महापालिका कार्यालयात ‘प्रवेश बंद’ केला जाईल, अशी आक्रमक भूमिका सोमवारी झालेल्या बैठकीत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. शनिवारी होणाऱ्या महानगरपालिका सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर जानेवारी २०१५च्या भांडवली मूल्यानुसार ‘कलम १२९’ ची सुधारणा २३ नुसार कराची आकारणी सुधारित करण्यास मंजुरी मागणीकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून गेल्या दोन-तीन दिवसांपासून घरफाळा वाढीस विरोध करण्यासाठी २० फेबु्रवारीला २० मिनिटे महापालिकेसमोर जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याची दखल घेत सोमवारी महापौर रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एक रुपयांचीही घरफाळा वाढ होऊन देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही सोशल मीडियांतून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणूनच आमची भूमिका जनतेला कळावी म्हणून सभेपूर्वीच आमचा निर्णय घेतला आहे, असे सांगून महापौर रामाणे म्हणाल्या की, जनता अगोदरच महागाईने त्रस्त आहे. त्यातच आता प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे घरफाळा वाढ केली तर जनतेचे कंबरडेच मोडणार आहे. आयुक्तांच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा करून तो कसा अन्यायकारक ठरणार आहे, हे प्रशासनाला पटवून देण्यात येईल. चर्चेनंतर सन २०११च्या भांडवली मूल्यांवरच घरफाळा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये वाढ होणार नाही. बैठकीला उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, सभागृह नेता प्रवीण केसरकर, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, राजसिंह शेळके, छाया पोवार, प्रतीक्षा पाटील आदी उपस्थित होते. ...तर उत्पन्न वाढेल : महापौरशहरातील मिळकतींचे गेल्या काही वर्षांपासून फेरसर्वेक्षण झालेले नाही. उत्पन्नवाढीच्यादृष्टीने ते होणे आवश्यक आहे. जर हे सर्वेक्षण झाले तर शहरातील १५ ते २० हजार मिळकतींना अद्याप घरफाळाच लागू झालेला नसल्याचे दिसून येईल. सर्वेक्षणानंतर या मिळकतींना घरफाळा लागू झाला तर सुमारे तीस टक्क्यांनी उत्पन्न वाढणार आहे, असे महापौर रामाणे यांनी स्पष्ट केले. स्थायी समिती सभेत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची अंमलबजावणी करून एकही मिळकत घरफाळ्याशिवाय राहू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे महापौरांनी सांगितले. सभागृहाची दिशाभूल केली : देशमुख भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, तो आता कसा डावलला जाऊ शकतो, अशी विचारणा केली असता देशमुख यांनी सांगितले की, काही अधिकाऱ्यांनी सभागृहाची दिशाभूल करत चुकीचे आकडे सांगितले होते. सर्वच मिळकतधारकांना घरफाळा वाढ होणार नाही. काहींचा वाढला तर काहींचा तो कमी होऊ शकतो, अशी बतावणी अधिकाऱ्यांनी केली होती; परंतु प्रत्यक्षात जबर घरफाळा वाढ सहन करावी लागली. मात्र, यापुढे हे होऊ देणार नाही. प्रसंगी भांडवली मूल्याचे धोरण बदलण्याचा आम्हाला विचार करावा लागेल. सर्वच नगरसेवक विरोधात उतरतीलमहासभेने प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतरही जर आयुक्त त्यांच्या अधिकारात घरफाळा वाढविण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. सर्व नगरसेवक एकमताने त्यांना कार्यालय प्रवेश बंद करतील, असा इशाराच पदाधिकाऱ्यांच्यावतीने काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी यावेळी दिला. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा घरफाळा वाढीला ठाम विरोध आहे. महासभेत त्याला विरोध केलाच जाईल, प्रसंगी रस्त्यावर उतरूनही आंदोलन करण्याची आमची तयारी आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
घरफाळा वाढविल्यास आयुक्तांना ‘प्रवेश बंद’
By admin | Published: February 16, 2016 12:32 AM