कोल्हापूर : माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, तहसीलदार दीपक शिंदे, सहायक आयुक्तविजयकुमार गायकवाड, सरपंच लक्ष्मण कोळी उपस्थित होते. बडोले म्हणाले, माणगावच्या स्मारकासाठी उपलब्ध जमिनीचा विचार करून त्वरित प्रस्ताव द्यावा. त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात येईल. बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण करण्यासाठी अशी स्मारके प्रेरणादायी ठरतील. जातीजातींमधील तेढ संपली पाहिजे, त्यासाठी एकजिनसी समाज व्हावा म्हणून सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रबुद्ध विचारांची देशाला गरज आहे. अनेक उपेक्षित जाती आहेत, त्यांची दु:खेही तेवढीच आहेत, ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, सध्या असलेल्या आरक्षणावर गदा येणार नाही. सध्या दहा टक्के अनुसूचित जातींच्या लोकांकडे जमीन आहे. उर्वरित ९० टक्के लोकांना जमीन नाही. त्यांच्यासाठी जमीन देण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.बडोले यांनी दीपस्तंभ मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची पाहणी केली. यावेळी संस्थेचे प्रमुख दीपक भोसले यांनी संंस्थेची माहिती दिली. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल कांबळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी कटिबद्ध
By admin | Published: March 02, 2015 9:57 PM