गडहिंग्लज : गडहिंग्लजला फुटबॉलची गौरवशाली परंपरा आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलचे सामने या ठिकाणी होतात; परंतु याठिकाणी अजूनही अद्ययावत मैदान नाही. त्यामुळे गडहिंग्लजला सुसज्ज स्टेडियम होण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून, त्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या ‘राष्ट्रीय फुटबॉल भूषण पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. यावेळी ‘फिफा’ निदेशक मारियानो डायस, केएएसचे फुटबॉल सचिव प्रा. अमर सासने, उपनगराध्यक्ष सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.याप्रसंगी राजस्थानचे रॉबिन झेवियर यांना ‘फुटबॉल भूषण’, पुसदच्या चेतना क्रीडा मंडळाला ‘जीवनगौरव’, तर कोल्हापूरच्या कुणाल चव्हाणचा ‘प्रतिभावान खेळाडू’ म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी सौरभ पाटील, प्रशांत सलवादे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.यावेळी मंडलिक म्हणाले, जिल्ह्यात कोल्हापूरनंतर गडहिंग्लजमध्येच मोठ्या प्रमाणात फुटबॉल रुजला आहे. ‘युनायटेड खेळाडू’ राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात ही अभिमानाची बाब आहे.मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजकरांच्या फुटबॉल वेडाचा मी साक्षीदार आहे. दिवाळीतील अखिल भारतीय स्पर्धांसाठी शौकिनांनी मैदान फुलून जाते. फुटबॉलला पाठबळ देण्यासाठी आपण तत्पर आहोत.
कार्यक्रमास युनायटेडचे अध्यक्ष संभाजी शिवारे, संचालक सतीश पाटील, महादेव पाटील, अॅड. सुरेश कुराडे, प्रशांत दड्डीकर, दीपक कुपन्नावर, सुभाष पाटील, रामचंद्र शिवणे आदी उपस्थित होते.युनायटेडचे सचिव यांनी प्रास्ताविक केले. यांनी आभार मानले.फुटबॉलने जगाला जोडले...!गडहिंग्लजसारख्या छोट्या शहरात सुरू असलेली फुटबॉलची दमदार वाटचाल प्रेरणादायी आहे. राजस्थानहून पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेलो असताना अव्वल गोव्याचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. यावरूनच फुटबॉल हा खेळ जगाला जोडत असल्याचे अधोरेखित झाल्याचे रॉबिन झेवियर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.