राम मगदूम ।गडहिंग्लज : पाच वर्षांपूर्वीच्या तथाकथित भूखंड घोटाळ्यानंतर गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे ‘सेस’च्या मुद्यावरून गडहिंग्लज विभागातील व्यापाºयांनी केलेला उठाव. मात्र, ‘सेस’चा प्रश्न हा राज्यव्यापी आहे. त्यामुळे व्यापारी आणि बाजार समितीचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन चर्चेतून हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.
१९४७ मध्ये स्थापन झालेल्या गडहिंग्लज बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे साडेतीन तालुके येतात. पूर्वी गडहिंग्लज विभागासह शेजारील हुक्केरी, गोकाक, चिकोडी व बेळगाव या कर्नाटकातील तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतीमाल येत होता. मात्र, अलीकडे गावोगावी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू झाल्यामुळे गडहिंग्लज बाजार समिती आवारातील शेतीमालाची आवक रोडावली आहे, त्यामुळेच बाजार समितीची आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.
कोटीच्या आसपास ‘सेस’ आणि आस्थापना खर्च पाऊण कोटी अशी स्थिती आहे.पूर्वीपासूनच गूळ, मिरची व भुईमूगाच्या आवकेमुळेही सीमाभागात मार्केट कमिटीचा नावलौकिक आहे. मात्र, अलीकडे शेतकरी नगदी पीक म्हणून उसाकडे मोठ्या प्रमाणात वळल्यामुळे आणि गुळावरील सरकारी निर्बंधामुळे गुळाच्या आवकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा फटका समितीला बसला आहे.
गडहिंग्लजसह नूल, हलकर्णी, बसर्गे, तेरणी, कळविकट्टे, हिडदुगी, महागाव, नेसरी, कडगाव, आजरा, उत्तूर, व्होन्याळी, मलिगे्र, गवसे, वाटंगी, मडिलगे, चंदगड, अडकूर, नागनवाडी, माणगाव, कोवाड, तुर्केवाडी, कार्वे फाटा, पाटणे फाटा, कानूर, तुडीये, शिनोळी, राजगोळी, कुदनूर, सुरूते, मुरगूड, कापशी, हमीदवाडा, लिंगनूर आदी प्रमुख गावातही काटा लावून सोयाबीन, शेंगा, मका इत्यादी शेतीमालाची खरेदी केली जाते. शेतीमालाची परस्पर खरेदी-विक्री होत असल्यामुळे बाजार समितीच्या ‘सेस’ वसुलीस मर्यादा येत आहेत. त्यामुळे ‘वे-ब्रीज’प्रमाणे बाजार समितीला उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याची गरज आहे.व्यापाºयांचे म्हणणे काय ?खुल्या अर्थव्यवस्थेत ‘जीएसटी’ लागू झाल्यामुळे जीवनावश्यक शेतीमालावर कोणतेही निर्बंध नकोत. प्रचलित ‘सेस’ वसुली बंद व्हावी.बाजार समितीच्या गडहिंग्लज व तुर्केवाडी बाजार आवारात उद्योजक-व्यापाºयांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत. शेतीमालही येत नाही, वेअर हाऊस नाही, त्यामुळे ‘सेस’ का द्यायचा ?समन्वयाची गरजसंचालक मंडळातील व्यापारी प्रतिनिधी विश्वनाथ करंबळी व बाळासाहेब बांदिवडेकर आणि नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणारे काजू प्रक्रिया उद्योजक माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे यांनी या प्रश्नात मध्यस्थाची भूमिका बजावून समन्वयाने या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे.काय करता येईल ?गडहिंग्लज व तुर्केवाडी बाजार आवारात शेतीमाल प्रक्रिया उद्योजक आणि व्यापाºयांसाठी पुरेशी जागा व सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या.शेतकरी आणि व्यापाºयांसाठी वेअर हाऊस (गोदाम) सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीमालास चांगला भाव आणि उद्योजकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होईल.भाजीपाला सौदे हवेत !गडहिंग्लज बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्यासाठी ‘सेल हॉल’ बांधण्यात आला आहे. परंतु, त्याठिकाणी भाजीपाला सौदा होत नाही. तर्केवाडी आवारातही भाजीपाला सौदा सुरू करता येईल. त्यामुळे बेळगावला जाणाºया मिरची, रताळे व बटाटा उत्पादकांची सोय होऊन समितीला ‘सेस’ही मिळेल.