लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या समितीला वैधानिक दर्जा देण्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी स्पष्ट नकार दिला. तुम्हीच समिती नेमा आणि लोकमानस समजून घेऊन तुम्हीच वस्तुनिष्ठ अहवाल द्या, अशा शब्दांत दादांनी सर्वपक्षीय अंबाबाई भक्त समितीच्या कार्यकर्त्यांना सांगीतले. तीन महिन्यांनी समितीने आपल्या अहवालाद्वारे केलेल्या सूचना व दिलेला सल्ला म्हणजे निर्णय नसून, निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्याच्या विधि व न्याय खात्याला असतील, असा खुलासाही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. पालकमंत्र्यांच्या या निवेदनाने कृती समितीचे सदस्य काहीसे नाराज झाले. अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचा तसेच तीन महिन्यांत या समितीने अहवाल द्यावा, असा निर्णय पालकमंत्री पाटील यांनी घोषित केला होता. त्यास अनुसरून बुधवारी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास गेले होते. त्या ठिकाणी पालकमंत्रीच कृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेटले. आपण नेमलेल्या समितीवरील सदस्यांची नावे निश्चित करावीत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करावे, त्याचबरोबर या समितीला वैधानिक दर्जा द्यावा, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली. समितीला वैधानिक दर्जा दिला तरच समितीचे म्हणणे उच्च न्यायालयात टिकू शकेल, अन्यथा त्याला अर्थ राहणार नाही, असेही देसाई यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी ही मागणी थेट फेटाळून लावली. पुजारी हटावबाबतचा निर्णय ही समिती घेणार नाही, तर निर्णय विधि व न्याय खाते घेणार आहे. समितीने फक्त सल्ला देण्याचे काम करायचे आहे. जनमानस काय आहे ते समजून घ्यावे. पगारी पुजारी ठेवायचे झाल्यास कोणाला प्राधान्य द्यायचे, निकष काय असावेत, परंपरागत पद्धतीस नेमके काय बदल केले पाहिजेत, यासंबंधीच्या सूचना समितीने द्याव्यात, असे पालकमंत्री म्हणाले.सीसीटीव्ही कॅमेरे बसवा अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात सीसीटीव्ही बसवावेत, अशी आमची मागणी आहे. सीसीटीव्ही बसवायला गेल्यावर तेथे वादाचा प्रसंग घडला. आम्हाला संघर्ष करायचा नाही; पण तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
‘पुजारी हटाओ’साठीच्या समितीस वैधानिकता नाही
By admin | Published: June 29, 2017 12:55 AM