कोल्हापूर : दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती साचून पंचगंगा नदीपात्रात गाळ साचला असल्यास गाळ व वाळू काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का, याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे दिल्या. मी वाळू काढायचे म्हटल्यावर त्यातून कोणतेही राजकारण होऊ नये, त्यातील नियम पाहून आणि लोकांची सुरक्षितता विचारात घेऊनच हा उपाय सुचविला असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत राजर्षी शाहू सभागृहात आढावा बैठक झाली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराच्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल,’ अशी ग्वाही पवार यांनी दिली. बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार सर्वश्री पी.एन. पाटील, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबीटकर यांच्यासह माजी आमदार, पदाधिकारी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सन २००५,२०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जीवित व वित्त हानी झाली आहे. शेती, रस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात दरड कोसळणे, भूस्खलन झाले आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
ग्राम विकास मंत्री मुश्रीफ व राज्यमंत्री यड्रावकर यांनी जिल्ह्यातील विविध भागात रस्ते, पूल, शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे झालेल्या हानीबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहर परिसरातील पूर परिस्थिती, मदतकार्य व नुकसानीबाबत सादरीकरण केले.
----------
रहिवासी चाळ...
जिल्ह्यातील दत्त, गुरुदत्त, जवाहर आणि शरद या साखर कारखान्यांच्या परिसरात ‘रहिवासी चाळ’ उभी केल्यास कायमस्वरूपी स्थलांतरित होण्यासाठी इच्छुक नसणाऱ्या नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय होईल. इतर वेळी ऊसतोड कामगारांची या ठिकाणी व्यवस्था होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
वीज पुरवठा तातडीने
राज्यात वेळेत वीज बिल भरणा करणारा कोल्हापूर जिल्हा आहे, याबद्दल कोल्हापूरकरांचे कौतुक करून गरज भासल्यास अधिक मनुष्यबळ घ्या, पण जिल्ह्यातील वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केल्या.
फोटो : २७०७२०२१-कोल-अजित पवार मिटिंग
कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर व विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.