कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास (सीपीआर) सर्जिकल साहित्यपुरवठा करणाऱ्या वाय.पी. पोवारनगरातील न्यूटन एंटरप्रायझेस वितरक कंपनीस ८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. सीपीआर प्रशासनाने हे पैसे दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली एकूण चार सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी घेतला.
समितीने सीपीआरला व्यक्तिश: भेट देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून तो अहवाल आवश्यक त्या कागदपत्रांनुसार त्वरित द्यावा, असेही चौकशी समिती नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे.न्यूटनने परवान्यात बनावटगिरी करून ठेका मिळवला. सीपीआर प्रशासनाने कंपनीस ९ कोटी ५६ लाखांपैकी ८ कोटी दिले. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने बनावट परवान्याप्रकरणी कारवाई करावी, असे पत्र सीपीआर प्रशासनास दिले आहे. मात्र, सीपीआर प्रशासन या प्रकरणात कारवाई करण्यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचे पुढे आले होते. यामुळे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी २४ जानेवारी २०२४ रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे झाली होती. त्याची दखल घेऊन बनावट अन्न व औषध परवाना, दस्तऐवज वापरून निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याप्रकरणी चौकशी समितीची स्थापना झाली आहे. चौकशी समितीने नि:पक्षपातीपणे कोणत्याही दबावाला भीक न घालता चौकशी केली, तर बनावटगिरीतील सर्व दोषी समोर येणार आहेत.
समितीत कोण?नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्याय वैद्यकीयशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. हेमंत गोडबोले, धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा. डॉ. सुनील लिलानी, मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रशासकीय अधिकारी समाधान जामकर हे समितीमध्ये सदस्य आहेत. एकूण चौघांची समिती आहे.