लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील शाहू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, सॅक, बूट, आदी साहित्य वाटपामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप नगरसेवक सागर चाळके, शशांक बावचकर व प्रकाश मोरबाळे यांनी केला होता. त्यानुसार शालेय साहित्य वाटपाच्या चौकशीसाठी समिती नेमून पुढील सभेत चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या वटहुकूमाने शाहू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यासाठी बारा लाख ६० हजारांचा निधी मंजूर करून त्याचा धनादेश ठेकेदारास दिला. याबाबत विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेत नगराध्यक्षांसमवेत बैठक घेतली. यावेळी मुलांना वितरित केलेल्या साहित्यामध्ये अनियमितता असल्याचा आरोप केल्यानंतर शालेय शिक्षण समितीसह पुन्हा बैठक घेण्याचे ठरले होते.
त्यानुसार सोमवारी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यानंतर माहिती देताना नगरसेवक चाळके यांनी अशा प्रकारचे कोणतेही शालेय साहित्य वाटप झाले नसल्याचा आरोप केला. नगरसेवक बावचकर यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली, तर दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने शालेय साहित्य खरेदी व वाटप कसे केले, असा प्रश्न उपस्थित केला.
नगरसेवक मोरबाळे यांनी नगरपालिकेकडून आत्मनिर्भर ही टेलिफिल्म करण्यासाठी एका व्यक्तीच्या नावे दीड लाखाचा निधी धनादेशाद्वारे दिला. अशा कोणत्याही कामासाठी अग्रीम देण्याची पद्धत नसताना रक्कम दिली कशी, असा आक्षेप नगरसेवकांनी घेतला. यावर मुख्याधिकारी ठेंगल यांनी या रकमेच्या वसुलीसाठी तत्काळ पत्र पाठवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.