कोल्हापूर : दीर्घ पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमधील डब्यांच्या रचनेत रेल्वेने धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणानुसार अशा मेल, एक्स्प्रेसमधून स्लिपर कोच पूर्णपणे हटवले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात केवळ वातानुकूलित बोगी असणार आहेत.
कोल्हापुरातून सुटणाऱ्या एक्स्प्रेसमधून कोयना एक्स्प्रेसचे १४ सर्वसामान्य डबे बंद करून स्लिपर कोच करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. अन्य एक्स्प्रेसमध्येही हे बदल होणार आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी अद्यापही हे धोरण राबविले नसल्याचे सांगितले.सर्वसाधारणपणे प्रतितास १३० किंवा त्याहून अधिक वेगाने धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेसमध्ये नाॅन एसी कोचमध्ये तांत्रिक दोष निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व ट्रेनमधील स्लिपर कोच काढले जाणार आहेत. कोल्हापुरातून कोयना, निजामुद्दीन, हरिप्रिया, अहमदाबाद, राणी चन्नमा, महाराष्ट्र, महालक्ष्मी, सह्याद्री दीक्षाभूमी, नागपूर एक्स्प्रेस, कलबुर्गी, हैदराबाद या एक्स्प्रेस सुटतात. पहिल्या टप्प्यात कोयना एक्स्प्रेसचे १४ सर्वसामान्य बोगी रद्द करून येथे एसी डबे सुरू करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे, असा आरोप प्रवासी संघटनांकडून होत आहे.
सर्व सामन्यांना एसी प्रवास कसा परवडेल ?कोल्हापुरातून पुणे, सोलापूर, मुंबई, धनबाद आदी ठिकाणी जाणाऱ्यांमध्ये सर्वसामन्यांसह मजूर लोकांचा समावेश आहे. त्यामुळे अशा सर्वसामन्यांना जनरल डब्यातून प्रवास करणे शक्य नाही. एसीचे भाडे खिशाला न परवडणारे आहे. सर्वसाधारण तिकीट दरापेक्षा एसीचा दर पाचपट अधिक आहे.
कोयना एक्स्प्रेसमधील १४ जनरल डबे बंद करून एसी कोच केले जाणार आहेत. या पुढे बहुतांश जनरल डबे बंद करून सर्वच एक्स्प्रेस, मेलमध्ये एसी कोचवरच रेल्वेने भर दिला आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावण्याचा हा रेल्वेचा डाव आहे. यावर आवाज उठविणे गरजेचे आहे. -शिवनाथ बियाणी, मध्य रेल्वे प्रवासी संघटना, सल्लागार सदस्य (पुणे)
कोल्हापुरातून सुटणाऱ्या एकाही एक्स्प्रेस, मेलमधील स्लिपर कोचीस किंवा जनरल डबे कमी केलेले नाहीत. याबाबत कोणतेही आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले नाहीत. - विजय कुमार, प्रबंधक, कोल्हापूर रेल्वे स्थानक