कोल्हापूर : कुरकुरीत शेव, लालेलाल तवंग, उकडलेल्या बटाट्याच्या लहान-लहान फोडी आणि त्याच्या सोबतीला लिंबू,पाव घेत खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोल्हापूर महापालिकेजवळील एका हॉटेलमध्ये महाडिक यांनी पातळ-भाजीचा आस्वाद घेत २०१९ च्या लोकसभेला मला साथ द्यावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवाजी पेठेतील मिसळीचा आस्वादानंतर त्यांनी पातळ भाजीनिमित्ताने कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेतल्या.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात दोन्ही काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी सकाळी चारचाकी वाहनातून त्यांचे हॉटेलजवळ आगमन झाले. त्यांच्यासोबत माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक शेखर कुसाळे, विकी महाडिक व अन्य कार्यकर्त्ते होते.
यावेळी ‘मुन्ना साहेब , आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. गुलाब शेख (चाचा) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सुमारे २० मिनिटे त्यांनी सोमवार, शुक्रवार व शनिवार पेठेतील कार्यकर्त्यांशी चर्चा केली.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, नगरसेवक किरण शिराळे, ईश्वर परमार, माजी उपमहापौर चंद्रकांत सांगावकर आदी होते. आस्वादानंतर त्यांनी हॉटेल बाहेर कार्यकर्त्यांचे आभार मानत मला लोकसभेला साथ द्यावी ,असे आवाहन केले.यावेळी ताराराणी आघाडीचे नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे किरण नकाते, माजी नगरसेवक रमेश पोवार, उदय जगताप, महेश वासुदेव, विश्वनाथ सागांवकर, ओंकार परमणे, रियाज सुभेदार, इंद्रजित जाधव, अमित सांगावकर, अमित क्षीरसागर, बाळासाहेब काळे, सचिन ढणाल, संग्राम निकम आदी उपस्थित होते.
दोन्ही कॉग्रेसचे पदाधिकारी , नगसेवकांची अनुपस्थिती...खासदार महाडिक यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात राबता वाढविला आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेत तर मंगळवारी महापालिका परिसरातील नागरिकांशी पातळ-भाजीच्या निमित्ताने संवाद साधला. वरिष्ठ पातळीवरुन दोन्ही कॉंग्रेसची आघाडी निश्चित आहे. या गाठी-भेटीवेळी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांची अनुपस्थित होती, अशी चर्चा यावेळी सुरु होती. पण ; ताराराणी आघाडी व भाजपचे नगरसेवकांची हजेरी महाडिक यांच्या भेटीवेळी दिसून येत आहे.