कोल्हापूर : येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने येत्या ६ मे रोजी किमान शंभर जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे नियोजन केल्याची माहिती धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, साहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. डी. वाबळे आणि सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. सर्व जातीय,धर्मिय व आंतरजातीय विवाह त्यांच्या रितीरिवाजानुसार करण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही या सोहळ््यासाठी मोलाचे सहकार्य आहे.या विवाह समारंभाच्या नियोजनासाठी शुक्रवारी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात विविध संस्था-संघटनांची बैठक झाली. त्यास सुमारे १३० संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उद्योजक भरत ओसवाल, पारस ओसवाल, विजयसिंह डोंगळे, अतूल जोशी आदींनी विविध सूचना केल्या. साहाय्यक धर्मादाय आयुक्त राहूल चव्हाण यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.
लग्न समारंभातील उधळपट्टी रोखली जावी व गोरगरिब कुटुंबातील विवाह चांगल्यारितीने व्हावेत यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने राज्यभर सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘समाजाच्या पुढाकारातून समाजाचे भले’ असा दृष्टिकोन त्यामागे असल्याचे श्रीमती निवेदिता पवार यांनी सांगितले.विवाहास इच्छुक असलेल्या जोडप्यांची येथील राजाराम रोडवरील वसंत संकुलमधील धर्मादाय आयुक्त कार्यालयात शुक्रवारपासून नांवनोंदणी सुरु झाली. तिथे स्वतंत्र विवाह नोंदणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. किमान १०० जोडप्यांचा तरी विवाह करण्याचे नियोजन आहे परंतू त्याहून जास्त नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे राहूल चिकोडे यांनी सांगितले.
हा सोहळा बहुधा पेटाळा मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी खास समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये सदानंद मराठे उपाध्यक्ष आहेत. समृध्दी माने या सचिव, सुप्रिया ताडे, विजयसिंह डोंगळे हे सदस्य आहेत.
लग्नात हे देणार
- दोघांनाही पेहराव
- संसारसेट देणार
- गादी सेट
- दोन महिन्यांचे धान्य देणार
- सुवर्ण पालखी ट्रस्ट (भरत ओसवाल)कडून मणीमंगळसुत्र.
- महालक्ष्मी धर्मशाळेकडून जेवण व्यवस्था
- विवाह नोंदणी प्रमाणपत्रही देणार
मदतीचा ओघकोणत्याही चांगल्या कार्याला भरभरून मदत करण्याची कोल्हापूरची परंपराच असल्याने या सोहळ््यासाठी शुक्रवारपासूनच मदतीचा ओघ सुरु झाला. जयसिंगपूरच्या सिध्दराज देवालयाचे श्यामसुंदर मालू यांनी २१ हजार तर अॅड अमित बाडकर, अॅड वैभव पेडणेकर, अॅड दीपक पाटील, अॅड प्रविण कदम, दैवज्ञ मराठा बोर्डिंग, शिरोळ तालुका मोटरमालक संघटना, महागांवचा संत गजानन महाराज ट्रस्ट, कुरुंदवाडचे एस.के.पाटील महाविद्यालय, कोल्हापूर लिंगायत तेली समाज, गडहिंग्लजचे शिवराज विद्या संकुल, जयसिंगपूरचा सिध्दीविनायक ट्रस्ट यांनी प्रत्येकी ११ हजार रुपयांची निधी जाहीर केला. घडशी वाजंत्री संघटनेकडून लग्न कार्यालयासाठी मोफत वाजंत्री देण्यात येणार आहेत.