- विक्रम पाटील
करंजफेण- पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा ते नांदारी या दरम्यानच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे.ए.डी.बी योजनेतून २०५ कोटीच्या कामाला सुरूवात झाली असून रस्त्याच्या शेजारी शेत जमीन असलेल्या शेतकर्यांच्या शेताचा भाग रस्त्यामध्ये जात आहे.परंतू कोणतीही पूर्व सुचना न देता संबंधीत विभागाने काम सुरू केल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या शेत जमिनीची भरपाई द्या अन्यथा उद्या मंगळवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजता शेतकरी एकजूटीने रस्त्याचे काम बंद पाडू असा इशारा कोतोली येथे झालेल्या पत्रकार बैठकीत शेतकर्यांनी दिला आहे.
रस्त्याचे रूंदीकरण करत असताना शेताच्या बांधावरील झाडे परस्पर तोडून नेली आहेत. काही शेतकर्यांच्या शेतीच्या पाईप लाइनचे देखील मोठे नुकसान झाले आहे.झालेली नुकसानपाई तातडीने दयावी अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.यावेळी अँड.विजय पाटील,कोतोलीचे माजी सरपंच पी.एम.पाटील,दिलीप कळेकर,बाबासो साळोखे,मनोहर खोत,विलास पाटील,विलास फिरंगे आदी शेतकरी उपस्थित होते.