लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे विद्युत पंप, ट्रान्सफॉर्मर व इतर इलेक्ट्रिक साहित्यांचे महापुरात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्याचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन इरिगेशन फेडरेशनच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांना देण्यात आले.
महापुरामुळे सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. त्याचबरोबर सहकारी पाणीपुरवठा संस्था यांचे ट्रान्सफाॅर्मर, विद्युत मोटारी व इलेक्ट्रिक साहित्य यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्याचे पंचनामे करून ज्याप्रमाणे घर व शेती, तसेच इतर बाबींचा नुकसानभरपाईत समावेश करणार त्याप्रमाणे कृषिपंप साहित्य यांचाही समावेश करून त्याप्रमाणे त्यांना तत्काळ नुकसानभरपाईची रक्कम मिळावी. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०१९ ला आंदोलन केल्यामुळे महावितरणने पंचनामे केले होते. मात्र, १३ कोटी ८४ लाख भरपाई अद्याप संस्थांना मिळालेली नाही. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील व आम्ही दोन्ही खासदार यांची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. त्यानंतर एकत्रितपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ, असे खासदार मंडलिक यांनी सांगितले. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, उपाध्यक्ष सुभाष शहापुरे, संचालक संजय पाटील, एस. ए. कुलकर्णी, रणजित जाधव, सचिन जमदाडे, मारुती पाटील उपस्थित होते.
पंपाची वीज दरवाढ रद्द करा
सहकारी पाणीपुरवठा संस्था एच. टी. व एल. टी.साठी जून २०२१ मध्ये प्रतियुनिट रु. ३.६९ पैसेप्रमाणे वाढीव दराने आकारणी करून वीज बिले पाठविलेली आहेत, तसेच व्हिलिंग चार्जेस रु. ०.५६ पैसे प्रति युनिट डिमांड चार्जेसमध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पेलणारी नसल्याचे यावेळी सांगितले.
फोटो ओळी : सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांसाठी इरिगेशन फेडरेशनच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांना निवेदन दिले. यावेळी विक्रांत पाटील, सुभाष शहापुरे, संजय पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-१७०८२०२१-कोल-इरिगेशन फेडरेशन)