कोल्हापूर : आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान येथील उड्डाणपूल प्रकल्पग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होेते.
आदमापूर येथे २०१८ मध्ये उड्डाणपुलाची निर्मिती सुरू झाली. २०२० मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. यामुळे गावातील १७१ शेतकरी, नागरिक बाधित झाले. त्यांची घरे, दुकाने, शेती या प्रकल्पात गेली. देवाचे काम म्हणून नागरिकांनीही आढेवेढे न घेता आपली जागा दिली. भूसंपादन झाले, उड्डाणपूल तयार झाला; पण बाधितांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
येथील १७१ बाधितांपैकी ३९ जणांची सहमती अजून आलेली नाही. त्यांची सहमती घेऊन सर्व प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर जागेच्या दरानुसार नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला. यावेळी बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होेते.
-