कोल्हापूर : जिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापुरात बसून थेट मुख्यमंत्र्यांकडे आपल्या तक्रारी, निवेदने सादर करता येणार आहेत; कारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेत आज, शुक्रवारपासून मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू होत असून, त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या कक्षाचे उद्घाटन होईल. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.या कक्षाचे निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. त्यामुळे ज्या नागरिकांना आपले म्हणणे, तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, ते या कक्षात आपले अर्ज, निवेदन, कागदपत्रे सादर करू शकतात. नागरिकांचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे, निवेदने, अर्ज, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जातात.
त्यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.