कोल्हापूर : कसबा बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानावरील भारत स्काऊट गाईड संस्थेच्या जागेवर जिल्हा लॉन असोसिएशन अतिक्रमण करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन, योग्य ती कारवाई न झाल्यास स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थेचे जिल्हा चिटणीस प्राचार्य विलास पोवार व जिल्हा कमिशनर शोभा तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.सरकारची मालकी असलेल्या १0 एकर क्षेत्रातील मेरी वेदर ग्राऊंड नाममात्र भाड्याने ९९ वर्षांच्या कराराने जिल्हा होमगार्ड, सैनिक कल्याण व स्काऊट गाईड या तीन संस्थांना दिली आहे. मालकी सरकारची असली तरी त्याची देखभाल दुरुस्ती महानगरपालिका प्रशासनाने करायची आहे. १९९२ मध्ये जिल्हा लॉन असोसिएशनने तेथील ३०० बाय ६०० क्षेत्राची जागा घेतली. ती जागा त्यांनी कंपौंड वॉल बांधून बंदिस्त केली.
काही वर्षांपूर्वी आणखी जागा घेण्याचा संस्थेने प्रयत्न केला, तेव्हा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आंदोलन करून तो प्रयत्न हाणून पाडला. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा असा प्रयत्न होत आहे. १२ फूट उंचीचे कुंपण घातले जात आहे. त्याविरोधात स्काऊट गाईट संस्थेने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रार करूनदेखील कारवाई झालेली नाही. तसेच त्याची दखलही घेतलेली नाही.मैदानाची जागा बंदिस्त करू नये, ती मोकळीच ठेवली पाहिजे. जर अतिक्रमण काढले नाही, तर आम्हाला दाद मागण्यासाठी जनआंदोलन करावे लागेल, तसेच न्यायालयातही जावे लागेल, असा इशारा प्राचार्य विलास पोवार यांनी दिला. महानगरपालिका शिक्षण सभापती अशोक जाधव यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. महापालिकेचे तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थी येथे स्काऊट गाईडचे शिक्षण घेत असून, त्यांची जागा कोणी बळकावणार असेल, तर त्याविरोधात रस्त्यावर यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.