कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या जन्मस्थळ विकासाच्या कामाबाबत खुद्द त्यासाठी नेमलेल्या राजर्षी शाहू जन्मस्थळ जतन व विकास समितीच्या सदस्यांनीच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे शुक्रवारी सकाळी जोरदार तक्रारी केल्या. जन्मस्थळाचे काम समाधानकारक झाले नसून जी मंडळी हे काम करत आहेत, ती आपल्या मर्जीनुसार करत आहेत. आम्हाला विचारले आणि आम्ही सूचना केल्यास त्यानुसार बदल करणे जड जाईल, असे काहींना वाटत असल्यानेच समितीची बैठकच दीड वर्षात घेतली नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर मग पालकमंत्री पाटील यांनी तातडीने आज, शनिवारीच ही बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता जन्मस्थळाच्या ठिकाणीच ही बैठक होत आहे.शाहू जयंतीनिमित्त जन्मस्थळावर जाऊन शाहू महाराजांना अभिवादन केल्यानंतर तिथे समितीचे सदस्य व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव मोरे, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत व वसंतराव मुळीक यांच्याशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. जन्मस्थळाचे काम करत असलेल्या आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर यांनी परवाच काम पूर्ण होण्यास सहा महिने लागतील, असे सांगितले होते व आमच्यावर विश्वास ठेवावा, असे विधान केले होते. त्यावरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला. समितीच्या सदस्यांना जराही विश्वासात न घेता तुम्ही काम करणार असाल, तर मग शासनाने ही समिती नेमलीच कशाला? अशीही विचारणा सदस्यांनी यावेळी केली.डॉ. पवार म्हणाले, ‘शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचे काम हे आमच्या बांधीलकीचे काम आहे. ते काम चांगलेच व्हायला हवे, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी आम्ही लागेल ती मदत करायला तयार आहे. तुम्ही बैठक बोलवा, आम्ही स्वखर्चाने यायला तयार आहे. परंतु, आता आम्हाला कोण काही सांगत नाही, याचेच वाईट वाटते.’इंद्रजित सावंत म्हणाले, ‘समितीवर आमची संशोधक म्हणून नियुक्ती आहे. असे असताना जन्मस्थळाचा विकास चुकीच्या पद्धतीने झाला तर लोक समितीने काय केले, असे आम्हाला विचारतील. आताची कामे होताना अनेक गोष्टींची पथ्ये पाळलेली नाहीत. कोणतेही काम समितीला विचारात घेऊनच व्हावे.’वसंतराव मुळीक म्हणाले, ‘जन्मस्थळाचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाईल, असे सांगण्यात येते. परंतु, तो करताना पुरातत्त्व विभागाचे संकेत पाळले नाहीत तर हे काम काटेकोरपणे कसे होईल, याचा विचार केला पाहिजे. साठमारीसह काही गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. नुसत्या चकाचक फरशा बसविल्या म्हणजे झाला विकास, असे या कामाकडे पाहिले जाऊ नये.’ यावेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, व्यंकाप्पा भोसले, उपमहापौर मोहन गोंजारे, आदिल फरास, लीला धुमाळ, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)जन्मस्थळी शाहूंना अभिवादनकसबा बावडा : कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळी शाहूंना अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, उपमहापौर मोहन गोंजारे यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहू जन्मस्थळाच्या कामाबाबत तक्रारी
By admin | Published: June 27, 2015 12:48 AM