कोल्हापूर : एक लाख रुपये कर्जाच्या बदल्यात सव्वापाच लाख रुपये परत देऊनही पुन्हा पैसे देण्यासाठी तगादा लावून पतीला मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी तक्रारीवरून खासगी सावकार संग्राम सासने (रा. पोस्ट आॅफिसनजीक, जोतिबा रोड, मुरगूड, ता. कागल) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या विवाहितेने संग्राम सासने या खासगी सावकाराकडून घरगुती कामासाठी दरमहा चार टक्के व्याजदराने सुमारे एक लाख रुपये घेतले होते.
त्या पैशाच्या बदल्यात सावकार सासने याने भरमसाट व्याज आकारून तक्रारदारांकडून वेळोवेळी सुमारे सव्वापाच लाख रुपये व वडिलांच्या नावे कोरे धनादेश घेतले. त्यानंतरही पैशासाठी तगादा लावला, आणखी पैसे दिले नाहीत तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी येऊन गोंधळ माजविणार. तुमच्या पतीला सोडणार नाही, अशा धमक्या दिल्या.
हा देवघेवीचा व्यवहार कदमवाडी येथे झाला होता. या प्रकरणी तक्रारदार महिलेने मंगळवारी (दि. १७) रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, खासगी सावकार संग्राम सासने याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.