कोल्हापूर : शहरातील मिळकतींना घरफाळा आकारण्यासंदर्भात सुरू असलेल्या जीआयएस सर्वेक्षणावेळी संबंधित कंपनीचे कर्मचारी नागरिकांकडून पैसे घेत असल्याची तक्रार करतानाच या कंपनीला बिल अदा करताना तसेच मुदतवाढ करताना चुकीचा निर्णय घेऊ नका, अशा आशयाचे निवेदन गुरुवारी शाश्वत प्रतिष्ठानतर्फे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना देण्यात आले.
यावेळी आयुक्त कलशेट्टी यांनी सदर कंपनीकडून दोन महिन्यांत काम पूर्ण करून घेण्यात येईल. जर मुदतीत त्यांनी काम पूर्ण केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी शाश्वत प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.जीआयएस पद्धतीने शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम सायबर टेक कंपनीने चौदा महिन्यांत पूर्ण करायचे ठरविले होते. पण तसे घडलेले नाही. चार वर्षांत कंपनीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
ज्या ठिकाणी काम झाले आहे तेथील कामाचा अनुभव वाईट असून कंपनीचे काही कर्मचारी पैसे घेत आहेत. तशा तक्रारीही यापूर्वी झालेल्या आहेत. आता तिसरी मुदतवाढ देण्याच्या तयारीत काही अधिकारी आहेत. तेव्हा कामाला होत असलेल्या विलंबाची तसेच पैसे उकळले जात असल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर राहुल चौधरी, सचिन पितांबरे, महंमद शरीफ सलीम काझी, युवराज लोखंडे, नामदेव मगदूम, चंद्रकांत खोंदे्र, दिलीप पाटील यांच्या सह्या आहेत.कोल्हापूर शहरातील मिळकतींचे जीआयएस पद्धतीने सर्वेक्षण करणाºया कंपनीविरोधात शाश्वत प्रतिष्ठानतर्फे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.