कोल्हापूर , दि. २६ : मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे पुणे जिल्ह्यातील जेजुरीनजीक असलेल्या राजेवाडी स्टेशनजवळ बुधवारी (दि. २५) रात्री लुटली. याप्रकरणी तिघा प्रवाशांनी कोल्हापूर रेल्वे पोलिसांत गुरुवारी सकाळी फिर्याद दिली. यामध्ये तीन प्रवाशांचे एकूण साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी की, बुधवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून प्रस्थान झाली. ही रेल्वे रात्री दीडच्या सुमारास जेजुरीजवळील राजेवाडी येथे सिग्नल न मिळाल्याने चालकाने थांबविली.
रेल्वे थांबताच चोरट्यांनी उघड्या खिडक्यांमधून हात घालून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. सात ते आठ डब्यात हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या आवाजामुळे अन्य डब्यांतील प्रवासी जागे झाले. त्यामुळे चोरटे पसार झाले.
रेल्वेचालकाने स्टेशनमध्ये चौकशी केली असता सिग्नलमध्ये बिघाड झाला असल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती राजेवाडी रेल्वे स्टेशनमधील अधिकाऱ्यांना दिली. चोरट्यांनी सिग्नलमध्ये बिघाड करून ही लूट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर प्रवाशांनी राजेवाडी ते कोल्हापूर प्रवास भीतीच्या छायेत केला.
दरम्यान, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनस येथे मुंबई-कोल्हापूर ही महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे गुरुवारी सकाळी पोहोचल्यानंतर कृष्णा श्रीकांत माने (रा. भोईवाडा, मुंबई), सुचित्रा प्रल्हाद इटेकरी (रा. निपाणी) व विजया केतन राजगुरू (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली.
या सर्वांचे एकूण साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. कोल्हापूर रेल्वे पोलिसांकडून हा गुन्हा मिरज रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याचा संपूर्ण तपास पुणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.